औरंगाबाद : त्याग, समर्पण आणि विश्वशांतीचा संदेश देणारा बकरी ईद अर्थात ‘ईद -उल -अजहा’ हा सण शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. छावणीतील मुख्य ईदगाहमध्ये ईदची विशेष नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी अलोट गर्दी केली होती. नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
छावणी येथील ईदगाहमध्ये सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ईदची नमाज सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ८ वाजेपासूनच मुस्लिम बांधवांचा ओघ सुरू झाला. अत्तराचा सुगंध, नवीन कपडे व ईदचा आनंद येथे आलेल्या अबालवृद्धांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ‘जमात -ए -इस्लामी हिंद’चे मार्गदर्शक तथा विचारवंत डॉ. जावेद मुकर्रम सिद्दीकी यांनी यावेळी उपस्थितांना बकरी ईदचे महत्व सांगितले. ‘इस्लामची धर्माची शिकवण आणि आपले आजचे आचरण’ यावर त्यांनी मार्गदर्शन केले. देशातील सद्याची कठिण परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. माणुसकी डोळ्यासमोर ठेवून निस्वार्थपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मौलाना नसीम मुफताही यांनी देखिल यावेळी उपस्थिांना मार्गदर्शन केले. आजच्या तरुण पिढीने आपला अमुल्यवेळ वाया न घालवता चांगल्या कामासाठी आयुष्य सार्थक करावे, असे ते म्हणाले. मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलतर्फे हाफेज शरीफ निझामी यांनी विविध ठरावांचे वाचन केले. उपस्थित जनसमुदायाने ठरावांना पाठिंबा दिला. जामा मशिदचे इमाम हाफेज मुस्तफा यांच्या नेतृत्वाखाली ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली होती. यावेळी देशात अमन, शांती, बंधुभाव, एकोपा कायम राहावा, यासाठी दुवा करण्यात आली. नमाजनंतर मुस्लिमबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.