लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शौचालय बांधकामात नांदेड जिल्हा परिषदेने राज्यात भरीव कामगिरी केली असली तरी अजूनही उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठे अंतर बाकी आहे़ मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा शौचालयांची कामे कासवगतीने सुरू आहेत़ शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील सहा महिन्यांत १ लाख ७० हजार शौचालयांचे बांधकाम करावे लागणार आहे़राज्यात नांदेड जिल्हा शौचालय बांधकामात यापूर्वी अग्रेसर राहिला आहे़ मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्या पुढाकारामुळे शौचालयांच्या बांधकामांनी गती घेतली होती़ मात्र मागील पाच महिन्यांपासून शौचालयांची कामे कासवगतीने सुरू आहेत़ २ आॅक्टोबर पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्तीची घोषणा फोल ठरणार आहे़ मार्च २०१८ पर्यंत दीड लाख शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट आहे़ जिल्हा निर्मल करण्यासाठी सर्व खातेप्रमुख, तालुकास्तरीय अधिकारी, विस्तार अधिकारी, मिनी बीडीओ यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीमध्ये उर्वरित शौचालय बांधून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे यांनी दिल्या आहेत़ जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट ४ लाख ३६ हजार ५१३ असून त्यापैकी २ लाख ४२ हजार २५३ शौचालय बांधून पूर्ण झाले आहेत़ तर १ लाख ७६ हजार ६९० शौचालयांची कामे अपूर्ण आहेत़ जिल्ह्यात एकमेव अर्धापूर तालुक्याने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ तर मुदखेड तालुक्याला १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३८ शौचालय बांधावे लागणार आहे़ यंदा बांधकाम केलेल्या शौचालयांची संख्या - मुदखेड- २४७०, धर्माबाद -२१३३, माहूर -२७००, भोकर-१२१५, नांदेड- ३१५४, हिमायतनगर -२३९८, उमरी-११३५, हदगाव-७३१८, बिलोली-६९७, देगलूर -२१४७, नायगाव-५९४,लोहा- १५३८, मुखेड- ७१९, किनवट-३७५७, कंधार - २३३९.
जिल्ह्यात शौचालयांची कामे कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:16 AM