शेख महेमूद
वाळूज महानगर : एमआयडीसीच्या वतीने साडेपाच कोटी रुपये खर्च करुन वाळूज उद्योगनगरीतील कामगार चौकात ट्रक टर्मिनल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या टर्मिनलमध्ये चालक-क्लिनरसाठी आरोग्यासह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून, एकाच वेळी १५० जड वाहनांची पार्किंग होऊ शकणार आहे.
दोन दशकांपूर्वी एमआयडीसीने कामगार चौकात बीओटी तत्वावर ट्रक टर्मिनल उभारले होते. मात्र, याची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनचालक व क्लिनर यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी एमआयडीसीकडे तक्रारी केल्या होत्या. लोकमतने या ट्रक टर्मिनलविषयी सविस्तर वृत्त प्रकाशित करुन एमआयडीसी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यानंतर एमआयडीसीने नवीन सर्व सुविधांयुक्त ट्रक टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात एमआयडीसीच्या मुंबई कार्यालयाकडेही पाठपुरावा केल्यानंतर ट्रक टर्मिनलच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे.
भव्य ट्रक टर्मिनलची उभारणी
वाळूज एमआयडीसीत वाहनचालक व क्लिनरची गैरसोय थांबावी व अद्ययावत ट्रक टर्मिनल उभे राहावे, यासाठी मुख्य अभियंता शिवहरी दराडे, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, उपअभियंता सुधीर सुत्रावे, सहायक अभियंता गणेश मुळीकर आदींच्या प्रयत्नांतून ५ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार महिन्यांपूर्वी याचे काम सुरु करण्यात आले असून, ११० मीटर लांबी व १२५ मीटर रुंदीचे टर्मिनल उभारले जाणार आहे. सध्या संरक्षक भिंती, सिमेंटीकरण आदींची कामे पूर्ण झाली आहेत. याचे काम पूर्ण झाल्यानंतर निविदा काढून हे ट्रक टर्मिनल बीओटी तत्वावर चालविण्यास दिले जाणार आहे.
या सुविधा मिळणार
ट्रक टर्मिनलमध्ये वाहनचालक व क्लिनरसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने चालक व क्लिनरची नियमित आरोग्य तपासणीे, आराम करण्यासाठी स्वतंत्र हॉल, स्वच्छतागृह, स्नानगृह, उपाहारगृह, गॅरेज राहणार आहे. या ठिकाणी आरएफआयडी पार्किंग सिस्टीमचा उपयोग केला जाणार असल्याने अनधिकृत वाहनांना टर्मिनलमध्ये प्रवेश मिळणार नाही.
कोट
या ट्रक टर्मिनलमध्ये १५० ट्रेलर पार्क होऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. टर्मिनलमध्ये उभ्या केलेल्या वाहनातील माल चोरी होऊ नये, यासाठी दोन हायमास्टही बसविण्यात येतील. या ट्रक टर्मिनलचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल.
भूषण हर्षे, कार्यकारी अभियंता,एमआयडीसी.
फोटो ओळ
वाळूज उद्योगनगरीतील कामगार चौकात अद्ययावत सर्व सुविधांयुक्त सुरु असलेले ट्रक टर्मिनलचे काम.