:सा बां विभागाच्या कार्यालयास कुलुप ठोकण्याचा इशारा
:सां. बा. विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा
: रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
वाळूज महानगर : वाळूज ते कमळापूर रस्ता डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपासून रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी धोकादायक खड्डे पडल्याने वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे सिमेंटीकरण व डांबरीकरणाचे काम गत तीन-चार वर्षांपूर्वी सुरू केले होते. वाळूज गावापासून जामा मशिदीपर्यंत रस्ता सिमेंटीकरण करण्यात आले. उर्वरित कमळापूरपर्यंत डांबरीकरणासाठी खडीकरणही करण्यात आले. त्यानंतर रस्त्याचे काम थांबले ते आतापर्यंत. पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव, जोगेश्वरी शिवारात अनेक कंपन्या असल्याने कामगार वाळूजमार्गे औद्योगिक क्षेत्रात ये-जा करतात. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे कामगारांना पंढरपूरमार्गे वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे कामगारांना इंधनाच्या वाढीव खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत असून, वेळेचा अपव्यय होत आहे.
या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे, यासाठी विविध पक्ष, संघटना व ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अभय दिले जात आहे. काम तत्काळ सुरू करण्यात यावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, फेरोज ऊर्फ बबलू पठाण, राहुल भालेराव, पोपट बनकर, अमजत पठाण, आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
फोटो ओळ- वाळूज-कमळापूर या रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले असून, ये-जा करणाऱ्या वाहनधारक व नागरिकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे.
-----------------------