वाळूज महानगर : कंपनीत कामासाठी गेलेल्या कामगाराची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान मुक्तार पठाण (रा. साजापूर) हा गुरुवार (दि. ८) सकाळी दुचाकीने (एम.एच.२०, डी.वाय. ८९८६) वाळूज एमआयडीसीतील औरंगाबाद ऑटो एनसिलरी या कंपनीत गेला होता. चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.
-----------------------------
बजाजनगरात महिलांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा
वाळूज महानगर : बजाजनगरात महिलासाठी स्वतंत्र कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या बजाजनगरातील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने लसीकरणासाठी येणाऱ्या महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. बजाजनगरात महिलासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, असे शिवसेना शाखा संघटक रूपाली शुक्ला यांनी माजी खा.चंद्रकांत खैरे यांना निवेदन दिले.
---------------------
भारतनगरात विजेचा लंपडाव
वाळूज महानगर : वाळूजच्या भारतनगरात सतत विजेचा लंपडाव सुरू राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना न देता दिवसभरातून अनेकदा वीज पुरवठा बंद करण्यात येतो. या सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज गायब झाल्यानंतर तक्रार करणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने ग्राहकात नाराजीचा सूर उमटत आहे.
-----------------------
सिडको स्मशानभूमी रोडवर अस्वच्छता
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील स्मशानभूमी रोडवर केरकचरा आणून टाकला जात असल्याने, या रस्त्यावर अस्वच्छता पसरली आहे. या भागातील भाजीपाला तसेच इतर विक्रेते रस्त्यालगतच केरकचरा टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. प्रशासनाकडून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात नसल्याने नागरिक व वाहनधारकात असंतोषाचे वातावरण आहे.
------------------------------