वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत कंपनीत कामाला गेलेल्या कामगाराची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल अर्जुन बरडे (रा. रांजणगाव) हे २१ डिसेंबरला सकाळी ७ वाजता दुचाकीने (एमएच २० एए ७२४२) कंपनीत कामाला गेले होते. पार्किंगमधून चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.
---------------------------
वाळूजला संशयित जेरबंद
वाळूज महानगर : गुन्हा करण्याच्या उद्देशाने सोमवारी (दि.२८) रात्री वाळूजच्या टी पॉइंटवर लपून बसलेल्या एका इसमास पोलिसांनी जेरबंद केले. सोमवारी रात्री वाळूज पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना रामराई टी पाॅइंटवर एक जण गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेला पोलिसांना दिसला. या संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याचे नाव चिवा ऊर्फ एजाज ठकसेन काळे (रा. वाळूज परिसर) असल्याचे पोलिसांना सांगितले.
-----------------
कीर्तनातून गोमाताविषयक प्रबोधन
वाळूज महानगर : वाळूज येथे गोमातेविषयी कीर्तन आयोजित करून भाविकांत जनजागृती करण्यात आली. येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड यांच्या कपिला गाईचे निधन झाल्याने त्यांनी सोमवारी गोमातेच्या दशक्रिया विधीनिमित्त कीर्तनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ह.भ.प. सोपान महाराज यांनी कीर्तनातून गोमातेविषयी समाजप्रबोधन केले. कार्यक्रमाला परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------------------
सिडको कृती समितीतर्फे निवेदन
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील प्रकल्प रद्द करण्यात येऊ नये, यासाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने माजी खा. चंद्रकांत खैरे यांना निवेदन सादर केले. सिडकोच्या संचालक मंडळाने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाळूज महानगरातील नागरिकांत असंतोष आहे. प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन माजी खा. खैरे यांनी शिष्टमंडळाला दिले.
----------------------
रांजणगावात मुख्य रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण
वाळूज महानगर : रांजणगावच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था सतत ठप्प पडत आहे. कमळापूर फाट्यापासून एकतानगरपर्यंत या रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. भाजीपाला विक्रेते तसेच हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे गावात ये-जा करणाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. या व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यास ग्रामपंचायत प्रशासन धजावत नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
-------------------------------