--------------------------
पंढरपुरात टिपू सुलतान जयंती
वाळूज महानगर : पंढरपुरात तहरीक-एक खुदादात संघटनेच्यावतीने हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिर्झा वजीर बेग तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच शेख अख्तर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला वसीम पठाण, शहाबाज चौधरी, अजीम शेख, शेख जावेद, सद्दाम नेहरी, एकनाथ कीर्तीकर आदींची उपस्थिती होती.
----------------------
ट्रक टर्मिनलमध्ये स्वच्छतेचा विसर
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील ट्रक टर्मिनलमध्ये स्वच्छता केली जात नसल्यामुळे वाहनतळात थांबणाऱ्या चालक व क्लिनर यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अस्वच्छतेमुळे वाहनतळात डासाचा प्रादुर्भावही वाढला आहे. या वाहनतळात स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी वाहनचालक व क्लिनर यांच्याकडून होत आहे.
------------------------
वाळूजच्या बाजारात पालेभाज्या स्वस्त
वाळूज महानगर : वाळूजच्या आठवडी बाजारात पालेभाज्या स्वस्त झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी भरणाऱ्या या आठवडी बाजारात ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भावही घसरले आहे. मेथी, पालक, करडी, शेपू आदी भाज्या प्रत्येकी ५ रुपये जुडीप्रमाणे विक्री होत असून कोथिंबीर १० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे. पालेभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये किलो असल्यामुळे कामगार ग्राहक कांद्याची कमी खरेदी करीत असल्याचे चित्र आठवडी बाजारात पहावयास मिळत आहे.
------------------
साजापूर चौफुलीवर अपघाताचा धोका
वाळूज महानगर : साजापूर चौफुलीवर दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. उद्योगनगरीतून मोठ्या प्रमाणात भाविक भांगसीगड, दौलताबाद, खुलताबाद आदी धार्मिक स्थळी या चौफुलीवरुन ये-जा करत असतात. मात्र या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी थांबत नसल्यामुळे रस्ता पार करताना अनेकदा अपघात घडत असतात. या चौफुलीवरील अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी शेख मुक्तार, राजू शेख आदींनी केली आहे.
---------------------