वाळूज महानगर : टेंभापुरी परिसरातील एका विहिरीत शनिवारी अनोळखी तरुणाचा मृतदेह मिळून आला. या मृताच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डवरुन त्याची ओळख पटली असून, कृष्णा अशोक कानडे (३० रा.टेंभापुरी, ता.गंगापूर)असे त्याचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या केली की खून याविषयी गूढ कायम आहे.
टेंभापूरी प्रकल्पातील एका खाजगी विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे याकुब पठाण (रा.लिंबेजळगाव) यांना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दिसून आले. पठाण यांनी याची माहिती वाळूज पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विहीर जवळपास ५० फू ट खोल असल्याने अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मृत कृष्णा कानडे तीन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. त्यास आई-वडील, पत्नी व मुलगा असून, मृत कृष्णाने आत्महत्या केली की त्याचा कुणी खून केला या विषयी गूढ कायम आहे. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.