साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अनेक विद्यावेतन योजना कामगार व त्यांच्या पाल्यांकरिता राबविण्यात येत आहेत. पाल्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी या योजना महत्त्वाच्या आहेत; परंतु ऑनलाईन, ऑफलाईनच्या फेऱ्यात कामगार कुटुंबीय वंचित राहत आहेत.
कुटुंबासाठी कल्याणकारी या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार कल्याण निधी भरणाऱ्या सर्व बँक, एस.टी. महामंडळ, बीएसएनएल, विद्युत विभाग, सर्व दुकाने, दवाखाने, कारखाने, वृत्तपत्रातील कर्मचारी, जिल्हा मार्केटिंग, सोना उद्योग, पावर प्लांट, फायनान्स, हाॅटेेल, बीअर बार कामगार, बेकरी, सुपर माकेट, टुर्स अँड ट्रॅव्हलर्स कामगार तसेच सर्व फायनान्स कंपनी क्षेत्रातील कर्मचारी व कामगार यांच्या कुटुंबीयांना योजनेचा लाभ घेता येतो.
इय्यता नववीपासून सर्व शैक्षणिक वर्षासाठी कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची मंडळाची योजना आहे. यासाठी किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक असून, २ ते ३ हजार रुपयांपर्यंत सर्वसाधारण शिष्यवृत्ती दिली जाते.
केजी टु पीजीपर्यंत अनेकजण लाभापासून वंचित..
कामगार पाल्यास परदेशात शिक्षणासाठी पाठवायचे असल्यास त्यासाठीसुद्धा योजना असून, पाल्यास ५० हजार रुपये इतक्या रकमेची परदेश शिष्यवृत्ती देण्यात येते. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्टीय पातळीवर विविध क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते; परंतु त्या योजनेत अनेक विद्यार्थी सहभागी होताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. नूतनीकरणाचाही विषय समोर आल्याने नाइलाज होतो. नियम शिथिल करण्याची गरज आहे.
- मधुकर खिल्लारे (कामगार नेता)
जगण्याची भ्रांत, नेट पॅकला पैसे मोजावे कसे
शाळेची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्याने शिकावे, की नेट पॅकसाठी महागडा मोबाईल वापरणे म्हणजे कुटुंबावर कर्जाचा डोंगरच उभा केल्यासारखी अवस्था कोराना काळात झाली आहे. येथे हाताला काम नाही, जगण्याची भ्रांत आहे, यासाठीची धडपड कुटुंबासमवेत सातत्याने सुरूच आहे. शासनाच्या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
- शलिम शहा (मजूर नेता)
ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे
कामगार पाल्यांसाठी विविध योजना असून, ऑनलाईनमध्ये तांत्रिक अडचणी असू शकतात; परंतु पात्र विद्यार्थ्याच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा होते. शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा.
- युवराज पडियाल (कामगार उपायुक्त)