औरंगाबाद : गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास २० कामगारांनी अर्धपोटीच जालना सोडले. प्रत्येकाने सोबत पोळ्या, कणीक, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, मीठ, मिरची पावडर आणि मसाल्याच्या पुड्या घेतल्या. रस्त्यात भूक लागलीच तर प्रत्येकाने सोबत दोन पोळ्या-भाकरी बांधून घेतल्या. सुमारे ४० किलोमीटर पायपीट केल्यानंतर थकवा आला म्हणून सर्व जण सटाणा शिवारात पहाटे ४ वाजेच्या सुमारास बसले. पाठीवरील पिशव्या रुळावर ठेवल्या आणि त्यावर डोके टेकविले. थकलेल्या जिवांना अवघ्या काही मिनिटांत गाढ झोप लागली आणि इथेच घात झाला. पहाटे भरधाव मालगाडीने या सर्वांना चिरडले. तीन जण रुळापासून काही अंतरावर झोपले होते. ते मात्र बचावले.
रेल्वे रुळावर मृत्यूचे तांडवमृत्यूचे तांडव काय असते हे शुक्रवारी पहाटे औरंगाबाद जिल्ह्याने अनुभवले. रात्रभर पायी चालून थकलेले जीव पहाटेच्या गार वाऱ्यात रेल्वे रुळावर काही क्षण विसावले अन् धडाडत आलेल्या रेल्वे मालगाडीने क्षणार्धात त्यांच्या अक्षरश: खांडोळ्याच केल्या. यात १६ जणांच्या चिंधड्या झाल्या. एक गंभीर जखमी आणि तिघे थोडक्यात बचावले. औरंगाबादहून २५ कि.मी. अंतरावरील सटाणा (ता.जि. औरंगाबाद) गावाजवळ शुक्रवारी पहाटे ५.२२ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
हाडामासांचे तुकडे कपड्यात गोळा केले हा अपघात एवढा भीषण होता की, पोलिसांना कामगारांच्या हाडामांसाचे तुकडे अक्षरश: कपड्यात गोळा करावे लागले. कोणता अवयव कोणत्या व्यक्तीचा आहे, हे ओळखणेसुद्धा अवघड झाले होते. अपघातात १४ कामगारांचे मृतदेह कपड्याचे गाठोडे बांधून जमा करावे लागले, तर दोन मजुरांनी घाटी रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्राण सोडला. या हृदयद्रावक घटनेने जिल्हा हादरला व हळहळलाही. रुळाच्या बाजूला झोपलेल्या तिघांचे प्राण सुदैवाने वाचले.
मध्य प्रदेशचे पथक दाखल मध्यप्रदेशातील १६ मजूर सटाणा येथे मालगाडीखाली चिरडून ठार झाल्याचे समजल्यावर भोपाळ येथून चार्टर्ड विमानाने एक पथक औरंगाबादेत दाखल झाले. या पथकात आदिवासीमंत्री मिनासिंह, आयपीएस आधिकारी राजेश चावला, आयसीपी केसरीसिंह व अन्य एकाचा समावेश आहे. या पथकाने घटनास्थळ, घाटीला भेट देऊन जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी चर्चा केली. मृतदेह मध्यप्रदेशात कसे नेता येतील याविषयी चर्चा केली. महाराष्ट्रात असलेल्या मध्यप्रदेशातील इतर कामगारांसंदर्भातही या पथकाने चर्चा केली.
५,00,000 मदत मृतांच्या कुटुंबियांना- मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. १६ मजुरांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त करीत या मदतीची घोषणा केली. याशिवाय जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परराज्यांतील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने चर्चा सुरू आहे. लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.