औरंगाबाद : बहिणीच्या घरी जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या कामगाराने शिवाजीनगर येथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.भगवान श्रावण शेलार (५०, रा. शिवाजीनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, भगवान शेलार हे चितेगाव येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. काही दिवसांपूर्वी पायाला दुखापत झाल्याने ते घरीच होते. शुक्रवारी सकाळी सिरसगाव येथील बहिणीला भेटून येतो, असे नातेवाईकांना सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, ते बहिणीच्या गावी पोहोचलेच नाही. शेलार यांच्या मुलाने शुक्रवारी रात्री ११ वाजता आत्याला फोन लावून वडील आले की नाही याची विचारणा केली; परंतु ते आले नसल्याचे त्यांनी सांगितले. भगवान यांनी घराबाहेर पडताना त्यांचा मोबाईल घरी ठेवला होता. दरम्यान शनिवारी सकाळी शिवाजीनगर परिसरात एका जणाने रेल्वेसमोर आत्महत्या केल्याचे पुंडलिकनगर पोलिसांना समजले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तेथे शेलार यांचे आधार कार्ड आढळले. यानंतर पोलिसांनी शेलार कु टुंबियांशी संपर्क साधला. याविषयी अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव कावरे यांनी तपास सुरू केला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
कामगाराची रेल्वेसमोर आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:06 PM