औरंगाबाद : जिल्हा ते तालुका मुख्यालयाला जोडणारे रस्ते तीन पदरी होणार आहेत. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील सुमारे ११२८ कोटींची कामे अॅन्युटी- हायब्रीड (कंत्राटदाराच्या गुंतवणुकीचे टप्प्या-टप्प्याने बिल देणे) या योजनेंतर्गत करण्यात येणार असून, बांधकाम विभागाने ७ निविदांपैकी ५ निविदा १९ जानेवारी रोजी उघडल्या आहेत. दोन कामांच्या फेरनिविदा मागवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २४५ कि़मी., तर जालना जिल्ह्यातील १३१ कि़मी. रस्ते तीन पदरी करण्यात येणार आहेत.
दोन पदर जड वाहनांसाठी तर उर्वरित रस्ता दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, असा दावा अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी केला. हायब्रीड अॅन्युटी या उपक्रमाला राज्यभरात औरंगाबादेत प्रतिसाद मिळाला आहे. महिनाभरात वर्कआॅर्डर होऊन कामे सुरू होतील. ३ कोटी रुपये प्रति कि़मी.पर्यंतचा खर्च होणार आहे.
१० मीटर रुंदीचे रस्ते डांबरीकरणातून केले जाणार आहेत. ३ पदरी रस्त्यांचे नियोजन असून त्यातील द्विपदरी भागातून जड वाहतूक जाईल, असे मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार आणि चव्हाण यांनी सांगितले. बांधकाम विभागाचा १५०० कोटींतून १३५० कि़मी. रस्त्यांची कामे करण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.