औरंगाबाद : राज्य सरकारनेदुष्काळाची घोषणा केली. प्रत्यक्षात दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन कामे आणि मदत होत नसल्याचे २५ जिल्ह्यांत केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. रोजगार हमी योजनेत ५ लाख लोक कामावर असल्याचे सरकार सांगते. प्रत्यक्षात यंत्रांनी कामे केली जातात. कामे करताना लोक दिसलेच नसल्याने ‘रोहयो’ची आकडेवारी बनावट असल्याची टीकाही त्यांनी केली.
प्रा. देसरडा म्हणाले, मी स्वत: राज्यातील २५ जिल्ह्यांत पाहणी केली. ग्रामीण भागातील दुष्काळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. निदर्शनास आलेली परिस्थिती गंभीर आहे. बहुतांश ठिकाणी पाणीबाणीसह भयावह स्थिती आहे; परंतु मुख्यमंत्री व मंत्री दररोज केवळ त्याच त्या घोषणा करीत आहेत. दुष्काळ निवारणासाठी प्रत्यक्ष मदत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, चारा नाही, शेतात कामे नाही. शेतकरी आणि शेतीसाठी अनेक योजना आहेत. योजनांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत; परंतु जनतेला काहीही फायदा होत नाही.
प्रा. देसरडा म्हणाले, ‘रोहयो’च्या कामांवर तुरळक लोक कामे करताना दिसली. त्यामुळे सरकारकडून सांगण्यात येणारी आकडेवारी बनावट आहे. दुष्काळामुळे २ कोटी शेतकरी, शेतमजुरांना ‘रोहयो’ची कामे मिळाली पाहिजे. कामे देऊ शकत नसतील, तर दररोज ५०० रुपये निर्वाह भत्ता द्यावा.
तेलंगणाप्रमाणे मदत द्यावीतेलंगणा सरकारने हंगामी हेक्टरी १० हजार याप्रमाणे २० हजार रुपयांची मदत दिली. त्याच धर्तीवर राज्यातही मदत करावी. विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करावी.
कृती कार्यक्रम ठरविणारमहाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळ, सर्व्हंटस् आॅफ इंडिया सोसायटी यांच्या वतीने पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेत २३ नोव्हेंबरला दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीअरिष्ट समस्यांवर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीवर विचारविनिमय करून कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. देसरडा यांनी दिली.