औरंगाबाद : स्मार्ट सिटीचे मेंटॉर संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीची बैठक २८ फेब्रुवारीला होणार आहे. या बैठकीत ११८ कोटींची ‘एमएसआय’ची निविदा अंतिम करणे, ‘ग्रीनफिल्ड’च्या ११०० कोटींचा निधी, यासह स्मार्ट सिटीसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेला २३० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये आतापर्यंत स्मार्ट सिटी बससेवा सुरू झालेली आहे. योजनेतून अनेक विकासकामे करणे प्रस्तावित आहेत. त्यादृष्टीने २८ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ११८ कोटींच्या ‘एमएसआय’च्या निविदेला मंजुरी देण्यासंदर्भात चर्चा होईल. याबरोबरच बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. त्यातून अनेक विषयांना मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेतील ११०० कोटी रुपयांचे ‘ग्रीनफिल्ड’मधील शिक्षण, पाणीपुरवठा, हेरिटेज, रस्ते, उद्याने यासाठी प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब होईल. शहराच्या विकासाच्या दृष्टीने कामे ठेवली जाणार आहेत. त्यासदेखील बैठकीत मंजुरी मिळेल. स्मार्ट सिटी योजनेत अनेक कामे प्रस्तावित आहेत. स्मार्ट बससेवा सुरू झालेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अनेक प्रकल्प स्मार्ट सिटीच्या निधीतून करण्यात येणार आहेत.
निधी अन्य कामांसाठीस्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११०० कोटी रुपये खर्चून वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्य असून, हा निधी शहरात विविध विकासकामांसाठी वापरण्याची मुभा देण्याचा निर्णय सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.