वाळूज महानगर : जागतिक व्यापार दिनानिमित्त मसिआ व वर्ल्ड टेल सेंटर मुंबईच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वाळूजच्या मसिआ सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात लघु उद्योग व जागतिक निर्यात संधी यावर उद्योजकांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योग सहसंचालक बी.एस.जोशी, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, इंडस्ट्री एक्सपर्ट व्ही.एस.गुप्ते, ईईपीसीचे सहसंचालक वरुण चुलाते, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे सल्लागार ए.ओ.कुरुविला तर प्रमुख पाहुणे म्हणून मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे उपस्थित होते.
उबी.एस. जोशी म्हणाले की, आज निर्यात क्षेत्रात महाराष्टचा सिंहाचा वाटा असून, निर्यात क्षेत्र लघु उद्योजकांना एका नवीन उंचीवर नेणारे क्षेत्र आहे. कुरुविला यांनी बाजारपेठेचा अंदाज व भविष्यातील गरजा ओळखून उत्कृष्ट उत्पादन करुन जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
गुप्ते यांनी ‘स्लाईड शो’द्वारे निर्यात संधी यावर सादरीकरण केले. जगभरात निर्यातीच्या अनेक संधी उपलब्ध असून लघु उद्योजकांनी स्वत:ला कमी न समजता संधीचा पुरेपुर फायदा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मसिआचे अध्यक्ष राजळे यांनी सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात नाव कमवून आलेल्या संधीचा मअिसाच्या पदाधिकाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
एकुण निर्यात ४० टक्के वाटा हा लघु उद्योजकांचा असल्याचे राजळे यांनी सांगितले. सूत्रसंचालन मसिआचे सचिव मनिष अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमाला मसिआचे माजी अध्यक्ष सुनिल भोसले, अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, उपाध्यक्ष अभय हंचनाळ, नारायण पवार, सचिव अर्जुन गायकवाड, राहुल मोगले, सचिन गायके, विकास पाटील, अनिल पाटील, सर्जेराव ठोंबरे, संदीप जोशी, अजय गांधी, रविंद्र कोंडेकर, किरण जगताप, राजेश मानधनी, अंकुल लामतुरे, कुंदन रेड्डी, सुमित मालानी, सुदीप आडतिया, प्रसिध्दी प्रमूख अब्दुल शेख, भगवान राऊत आदींची उपस्थिती होती.