- संतोष हिरेमठऔरंगाबाद : रक्तदाता म्हटले की, फक्त पुरुष... असेच सर्वांपुढे चित्र उभे राहते. सलाइनची सुई, इंजेक्शनला महिला घाबरतात, असाच समज असतो. परंतु रक्तदानात महिलाही आता दोन पाऊल पुढे टाकत आहेत. रक्तदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे.
महिलांच्या आहाराकडे आजही दुर्लक्ष होते. त्यातून कमी वजन, हिमोग्लोबिनची कमतरता असे प्रश्न उभे आहेत. पण या सगळ्यावर मात करत महिला रक्तदान करून गरजू रुग्णांचा जीव वाचण्यासाठी योगदान देत आहेत. विशेष म्हणजे रक्तपेढीत कार्यरत असलेल्या महिलाही रक्तदानात पुढे आहेत.
भाऊ नाही; पण मी रक्तदानासाठी आले पुढेमाझे वडील हे नियमितपणे रक्तदान करीत. अनेकजण अर्ध्या रात्री रक्त हवे म्हणून वडिलांकडे येत असत. मला भाऊ नाही. आम्ही दोन्ही बहिणीच आहोत. भाऊ असता तर त्याने वडिलांप्रमाणे नक्कीच रक्तदान केले असते. वडिलांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी मीही रक्तदानाचा निर्णय घेतला. आयुष्यातील पहिले रक्तदान रविवारी केले. त्यास कुटुंबीयांनीही पाठबळ दिले.- सबाहाद नासेर खान, रक्तदात्या
तुटवड्याप्रसंगी स्वत: रक्तदान करतेरक्तपेढीत काम करताना रक्तदानासाठी इतरांना आवाहन, प्रेरित करण्याचे काम केले जाते. पण एखाद्यावेळी तुटवडा निर्माण झाला तर स्वत:ही रक्तदान करते. महिलांच्या रक्तदानाचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. अनेक अडचणींवर मात करून महिला रक्तदानासाठी पुढे येत आहे. हे प्रमाण आणखी वाढले पाहिजे.- सुनीता बनकर, जनसंपर्क अधिकारी, विभागीय रक्तपेढी, घाटी
वजन कमी होते; पण शेवटी यशइतरांना रक्तदान करताना पाहून मलाही रक्तदान करावे वाटत असे. पण वजन खूप कमी होते. त्यामुळे वजन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. अखेर यश आले आणि मीदेखील रक्तदान करू लागले. आजपर्यंत १२ वेळा रक्तदान केले आहे. माझ्या मुलीनेही वयाच्या १८व्या वर्षी पहिले रक्तदान केले.- अरुणा क्षीरसागर, रक्तपेढी अधिकारी
महिलांच्या आहाराकडे लक्ष द्यावेआमच्या रक्तपेढीत रक्तदात्यांमध्ये साधारण ५ टक्के प्रमाण हे महिलांचे आहे. महिलांच्या प्रकृतीसंदर्भात अनेक प्रश्न असतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. परंतु अलीकडे मुलीदेखील रक्तदानासाठी येत आहेत. महिलांनी स्वत:च्या प्रकृतीकडे, आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यातून अधिकाधिक महिलांनाही रक्तदाता होता येईल आणि रक्तदानाचे प्रमाणही वाढेल. त्यादृष्टीने जनजागृती केली जात आहे.-डाॅ. मंजूषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढी