औरंगाबाद : मानवी रक्ताला अद्याप तरी कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे रक्तदानातूनच रक्ताची गरज पूर्ण होते. त्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. शहरातील एक परिवार रक्तदाता परिवार म्हणून ओळखला जातो. सामाजिक दायित्व म्हणून पतीच्या पावलावर पाऊल टाकत पत्नी आणि डॉक्टर मुलगाही नियमितपणे रक्तदान करीत आहे.
दुर्मिळ गटाचे रक्त हवे आहे, याची माहिती मिळताच तो रुग्ण ज्या शहरात आहे, तेथे स्वत:च्या खर्चाने शहरातील अनिल लुनिया हे विलंब न करता धाव घेतात. अनिल लुनिया यांचा ए आरएच हा निगेटिव्ह दुर्मिळ रक्तगट आहे. सुमारे साडेसतरा हजार लोकांमध्ये एकाचा हा रक्तगट असतो. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा घाटी रुग्णालयात रक्तदान केले. त्यावेळी एक महिला मुलाच्या रक्तासाठी भटकंती करीत असल्याचे लुनिया यांनी पाहिले. त्या महिलेच्या मुलासाठी त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले आणि एक प्रकारे रक्तदानाचा महायज्ञ त्यांच्याकडून सुरू झाला. आज त्यांनी वयाची ५७ वर्षे पूर्ण केली आहेत. या कालावधीत त्यांनी १११ वेळा रक्तदान करण्याचा टप्पा पार केला आहे. त्यांनी जनजागृती करीत अनेकांना रक्तदानासाठी प्रेरित केले.
विशेष म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांच्या पत्नी रसिला लुनिया यांनीही रक्तदानाच्या या कार्यात पाऊल टाकले. विवाहानंतर रसिला यांनीही पहिल्यांदा रक्तदान केले. त्यानंतर त्यांनी नियमितपणे रक्तदान करण्यास सुरुवात केली. आजघडीला त्यांनी २५ वेळा रक्तदान केले. या दोघांपोठोपाठ त्यांचा मुलगा डॉ. वंश लुनिया यांनीही रक्तदानाचा महायज्ञ सुरू केला. आतापर्यंत त्यांनी २२ वेळा रक्तदान केले आहे. हा परिवार रक्तदाता म्हणून परिचित झाला आहे.