- योगेश पायघन
औरंगाबाद : संपर्कातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली किंवा कोरोनाची बाधा झाली तर लपवू नका. कोरोना फक्त तुम्हालाच नव्हे तुमच्यासोबत इतरांनाही बाधा पोहोचवतो. अख्खे कुटुंब धोक्यात येते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये बाहेर पडू नका. आम्ही लढलो अन जिंकलोही. डॉक्टरांचे ऐकतोय. प्रशासनाला साथ दिली. तुम्हीही द्या. कोरोनामुक्त होण्यापेक्षा कोरोनामुक्त राहा, असे आवाहन कोरोनामुक्त झालेल्यांनी केले.
कोरोनामुक्त झालेल्या युवकांशी लोकमतने संवाद साधला. अनेक लोक डॉक्टरांशी हुज्जत घालतात. त्यांनी तसे वागायला नको. डॉक्टर , प्रशासन आपल्या मदतीला असताना त्यांना सहकार्य करणे प्रत्येकाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनानेही आनंद व्यक्त केला. मास्क वापरा. वेळोवेळी हात धुवा, दुखणे अंगावर काढू नका. मनाने औषधी घेणे टाळा, असेही त्यांनी सांगितले.
लावारिस होण्याची तर भीती ठेवाभाडेकरूला कोरोना झाला. आम्ही तपासणीला गेलो. तर घरातील तिघे पॉझिटिव्ह निघाले. मी १४ दिवसांचे उपचार घेऊन बुधवारी घरी परतलो. दोघांचा आज अहवाल निगेटिव्ह आला. उद्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर तेही घरी परततील. भाडेकरूही आजच घरी परतले. १४ दिवस एकच खोली. कुणी बोलायला नाही. लावारिस झाल्यासारखे वाटत होते. नशिबाने डॉक्टर बरे मिळाले म्हणून लवकर बरा होऊन परिवारात परतलो. घराबाहेर पडलोच नाही तर आपण परिवारापासून दुरावणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घरात राहा. कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगा. उगाच लावारिस कशापायी होता. नंतर तोंडही पाहायला मिळत नाही. काही तरी भीती बाळगा. किमान परिवाराचा तरी विचार करा. डॉक्टरसोबत वाद घालू नका. त्यांचा सल्ला पाळतोय. तुम्ही पण काळजी घ्या.-समतानगर येथील कोरोनामुक्त २५ वर्षीय तरुण वकील
आई-वडील बिहारलामला कशी बाधा झाली कळले नाही. मात्र, बाधा झाल्यावर १४ दिवस जग बदलले होते. फोनशिवाय माझ्याजवळ काहीच नव्हते. आई-वडील बिहारला, मी इथे एकटाच. ज्यांच्याकडे काम करण्यासाठी आलो ते काळजी घेत होते. मात्र, माझ्यामुळे सर्वांचा जीव धोक्यात आल्याची भावना उपचार घेत असताना दवाखान्यात सतावत होती. बुधवारी मी घरी परतलो. डॉक्टरांनी १४ दिवस अलगीकरणात राहण्याचा व औषधोपचारांच्या सूचना तंतोतंत पाळतोय. मास्क वापरतोय. अनुभवातून खूप शिकलो. सध्या आनंदी आयुष्य जगणाऱ्यांनी त्यांचे आयुष्य धोक्यात घालू नये. आपण तर बाधित होतोच. मात्र, अनेक जण आपल्यामुळे बाधित होतात. हे प्रत्येकाने लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे थांबवा.-समतानगर येथील कोरोनामुक्त १८ वर्षीय युवक
कोरोना झाला म्हणजे गुन्हेगार नाहीमी पुण्याला आयटी कंपनीत काम करून घरी परतलो होतो. स्वत:हून रुग्णालयात जाऊन तपासणी केली. डॉक्टरांनी गोळ्या, औषधी देऊन परत पाठवले. मला लक्षणे नव्हती, पण थोडा खोकला होता. खाजगीत तपासणी केली. या काळात स्वत:ला अलगीकरणात ठेवले. ३१ मार्चला बाधित असल्याचे कळल्यावर डॉक्टरांना सहकार्य केले. १४ दिवसांनंतरही मी कोरोनामुक्त झालो नव्हतो. दरम्यान, वडिलांना लागण होऊन ते दगावले. त्यांच्या चौथ्या टेस्टमध्ये कळले की त्यांना कोरोना झाला होता. मला २० मार्चला सुटी मिळाली. मी आणखी एक आठवडा अलगीकरणात राहणार आहे. कुटुंबियांचा विचार करून बाहेर न पडणेच याचा योग्य उपाय आहे. मात्र, बाधा झाल्यावर प्रशासनानेही सबुरीने घेऊन लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. कोरोना बाधा झाली म्हणजे गुन्हेगार झालो असे नाही. प्रशासनाने हा समजही दूर करावा. -आरेफ कॉलनी येथील कोरोनामुक्त ३८ वर्षीय आयटी अभियंता