- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : राज्य कर्करोग संस्था म्हणजे शासकीय कर्करोग रुग्णालयात अवघ्या २३ वर्षांचा युवक आला. त्याला गालाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. वयाच्या अवघ्या ११ वर्षी त्याने तंबाखूसेवन सुरू केले होते. तंबाखूमुळे काही होत नाही, असा अनेकांचा समज आहे. परंतु या युवकाला अवघ्या २३ वर्षी कर्करोगाने गाठले. शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली. ही परिस्थिती फक्त एखाद दुसऱ्याची नाही. कोरोना प्रादुर्भावातही कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या चाहुलीने ओपीडीत गर्दी वाढत आहे. या सगळ्यात एकूण कर्करोगापैकी ३० टक्के कर्करोग तंबाखूसेवनामुळे होत असल्याचे वास्तव आहे.
दरवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. ‘तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध’ हे यंदाचे घोषवाक्य आहे. गेल्या १४ महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना व्यक्तीच्या मृत्यूला तंबाखूसुद्धा कारणीभूत ठरत आहे. प्राणघातक असलेल्या ८ आजारांपैकी ६ आजार हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतात. एकूण कर्करोग रुग्णांपैकी ३० टक्के कर्करोग हे तंबाखू सेवनामुळे होतात. तंबाखूमुळे तोंडात पांढरा चट्टा, लाल चट्टा येतो. तोंड पूर्णपणे उघडता येत नाही. तोंडात फोड येतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, अन्ननलिका, श्वसननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, पोट, गर्भाशय आदी अवयवांचा कर्करोग होतो. धूम्रपानाने फुफ्फुसावर दुष्परिणाम होतो. हृदयविकार, रक्तदाब, पक्षाघाताचाही धोका वाढतो. कोरोना प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे. परंतु या परिस्थितीत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. ओपीडी वाढत आहे, कर्करोगाच्या शक्यतेने रुग्ण रुग्णालयात धाव घेत आहे. यात तंबाखूमुळे कर्करोगाला सामोरे जाण्याची वेळ अनेकांवर ओढवत आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील स्थिती- २०२० मध्ये ओपीडीत नवे रुग्ण-१०,५०१
-२०२० मध्ये ओपीडीत जुने रुग्ण-११,२००-२०२१ मध्ये जानेवारी ते एप्रिलपर्यंत ओपीडीत नवे रुग्ण-४,११४-२०२१ मध्ये जानेवारी ते एप्रिलपर्यंत ओपीडीत जुने रुग्ण-४,६२०-२०२० मध्ये एकूण शस्त्रक्रिया-१,०२१-२०२१ मध्ये आतापर्यंत शस्त्रक्रिया-५८८
युवकांनी व्यसनापासून दूर राहावेकोरोना प्रादुर्भावातही रुग्णालयातील सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते. रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू आहे. एखादा नवा रुग्ण ओपीडीत आला तर ७ दिवसांपर्यंत नवीन ओपीडी म्हणून नोंद असते. त्यानंतर तो आल्यास जुनी ओपीडी म्हणून नोंद होते. युवकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.- डाॅ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय
९५ टक्के रुग्णांना कर्करोगतोंडातील गाठ, जखमेमुळे रुग्णालयात येणाऱ्या ९५ टक्के रुग्णांना कर्करोगाचे निदान होते. ५ टक्के रुग्णांची गाठ ही साधी असते. तंबाखूमुळे होणारे कर्करोग हे काही एकाच जागेत होत नाही. २३ वर्षी तरुणाला गालाचा कर्करोग झाला. ११ व्या वर्षापासून तो तंबाखू खात होता. नुकतीच त्याची शस्त्रक्रिया झाली. वय लहान आहे म्हणून कर्करोग होणार नाही, असेही नाही. तंबाखूपासून दूर राहणे गरजेचे आहे.-डाॅ. अजय बोराळकर, सहयोगी प्राध्यापक, कर्करोग शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय कर्करोग रुग्णालय