औरंगाबाद : नर्स... असा आवाज दिला की रुग्णांसाठी प्रत्येक परिचारिका धावून जातात. रुग्णाला प्रथमोपचार देण्याची जबाबदारी त्या पार पाडतात. रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालतात. गेल्या १४ महिन्यांपासून त्यांना कोरोना संकटाला सामोरे जावे लागत आहे. या लढ्यातही परिचारिका एक पाऊल पुढे आहेत. संसाराचा गाडा ओढताना अनेक पती-पत्नीसोबतच ब्रदर, परिचारिका, अधिपरिचारिका, अधिपरिचारक, इंजार्ज सिस्टर म्हणून रुग्णसेवेचे व्रत पार पाडत आहेत. रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त रुग्णसेवेत असलेले काही दांपत्य...
पती-पत्नी दोघे घाटीत रुग्णसेवेतब्रदर सुरेश नालकर हे २०१३ पासून, तर त्यांच्या पत्नी परिचारिका स्वाती नालकर या २०१४ पासून घाटीत कार्यरत आहेत. सुरेश हे घाटीतील सध्या कक्ष क्रमांक-५ मध्ये, तर स्वाती या कक्ष-२८ या प्रसूतीपूर्व वॉर्डात रुग्णसेवा देत आहेत. नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेतल्याचा अभिमान आहे. रुग्ण जेव्हा व्यवस्थित होऊन घरी जातात, तीच आमच्या कामाची पावती असते. कोरोनामुळे होणारे मृत्यू वेदना देणारे आहेत. जणू जवळचाच कोणी गेला, असे वाटते. अनेकदा भीती वाटते. परंतु सगळे विसरून रुग्णसेवा बजावताे. कारण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, असे आम्ही मानतो, रुग्णसेवेबरोबर कौटुंबिक काळजी मिळून पार पाडतो, असे ते म्हणाले. मेट्रन विमल केदार, परिचारिका संघटनेच्या इंदुमती थोरात यांचे मार्गदर्शन मिळते, असेही ते म्हणाले.
पत्नी जिल्हा रुग्णालयात, तर पती कर्करोग रुग्णालयातधनंजय अनाप आणि राजेश्री सत्रे-अनाप हे दांपत्य अधिपरिचारक म्हणून शासकीय सेवेत रुग्णसेवा करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात कोविड सुरू झाल्यापासून राजेश्री या जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांना रुग्ण सेवा देत आहे, तर धनंजय अनाप घाटीत रोटेशनप्रमाणे कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. तसेच रोटेशन झाल्यावर शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करोग रुग्णांची सेवा बजावतात. कोविड रुग्णसेवा करताना मनामध्ये अजिबात भीती नसते. उलट एक प्रकारचे समाधान वाटते की, या भयंकर महामारीमध्ये आपण नागरिकांची सेवा करत आहेत आणि आपण परिचारिका (नर्सिंग) क्षेत्रात असल्याचा नक्कीच अभिमान वाटतो, असे ते म्हणाले.
पती घडवितात रुग्णसेवेचे हात, तर पत्नी निभावतात रुग्णसेवेचे व्रतपुष्पेंद्र निकुंभ आणि विद्या निकुंभ, असे रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या दांपत्याचे नाव आहे. २००९ पासून पुष्पेंद्र निकुंभ हे घाटीतील नर्सिंग महाविद्यालयात शिक्षक (ट्यूटर) म्हणून कार्यरत आहेत, तर विद्या निकुंभ याही घाटीत २००९ पासून परिचारिकापदी कार्यरत आहेत. त्यापूर्वी हे दोघेही मुंबईतील जीटी रुग्णालयात कार्यरत होते. अधिपरिचारिका म्हणून सुरुवात केल्यानंतर आज इंजार्च म्हणून विद्या निकुंभ या कार्यरत आहेत. घाटीतील १२ वर्षाच्या कार्यकाळात अनेक विभागाच्या वाॅर्डांत विद्या निकुंभ यांनी काम केले आहे. सध्या त्या वाॅर्ड-२९ म्हणजे सिझेरिअन वाॅर्डात काम करत आहेत. सिझर झाल्यानंतर आईला नवजात शिशूला दूध पाजणे शक्य होत नाही. बाळासाठी आईचे दूध म्हणजे अमृतच ठरते. अशावेळी बाळाची कशी काळजी घ्यावी, दूध कसे पाजावे, यासाठी त्यांची धडपड सुरू असते.
रुग्णसेवा करताना दोघेही बाधित आता पुन्हा कोविड रुग्णसेवेतघाटी रुग्णालयातील असेच सेवावृत्ती दांपत्य म्हणजे स्नेहल बनसोडे आणि दीपमाला वाघमारे-बनसोडे हे होय. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हे दांपत्य कोविड रुग्णाच्या वॉर्डात सेवा देत होते. कोविडच्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये सेवा बजावताना सप्टेंबरमध्ये परिचारिका दीपमाला यांना कोविड झाला. पती स्नेहल यांना त्यानंतर दोन-तीन दिवसांनी कोविडने गाठले. दोघेही घाटीतच दाखल झाले. त्यातून स्नेहल लवकर सावरले. परंतु दीपमाला यांची प्रकृती गंभीर झाली. जवळपास २० दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु आरोग्यसेवेवर आलेल्या ताणामुळे त्यांना लवकरच पुन्हा सेवेसाठी रुजू व्हावे लागले. तेव्हापासून स्नेहल कोविड आयसीसीयू वॉर्डातच सेवा देत आहेत. मध्यंतरी काही दिवस इतर वॉर्डात सेवा करून दीपमालाही पुन्हा आता कोविडच्या वॉर्ड ४ मध्ये कार्यरत आहेत. जिवावर बेतल्यानंतर पुन्हा नव्या दमाने रुग्णसेवा करताना या दांपत्यांचा उत्साह थोडाही मावळलेला नाही.