औरंगाबाद : एकीकडे मुलगा अगदीच एक- दीड वर्षाचा असल्याने कामाच्या वेळेवर आलेली बंधने आणि दुसरीकडे कामाला वाहून घेतलेली जपानी माणसे. त्यात पुन्हा भाषेचा अडसर; पण ही कसरत लिलया सांभाळत अपर्णा करिअरचा एकेक टप्पा गाठत गेल्या आणि आज त्या जर्मन मल्टीनॅशनल ग्रुपच्या ग्लोबल सर्व्हिस हेड म्हणून कार्यरत आहेत.
सध्याच्या अपर्णा देशपांडे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या अपर्णा भालेराव. शारदा मंदिरमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर १९९९ साली जेएनईसी महाविद्यालयातून त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यात नोकरी करत असताना कामानिमित्त अनेकदा परदेशवारी केली; पण खरे आव्हान वाटले ते जपानला गेल्यावर. कारण अपर्णा या बाहेरच्या देशातून त्या कंपनीमध्ये गेलेल्या एकमेव व्यक्ती होत्या. ऑफिसमध्ये कुणालाही इंग्रजी यायचे नाही आणि अपर्णा यांना जापनीज भाषा जमायची नाही; पण जापनीज शिकून अपर्णा यांनी सुरुवातीला जपानी लोकांची मने ओळखून घेतली आणि त्यानंतर कामावरची अढळ श्रद्धा, आपल्या क्षेत्राचे इत्यंभूत ज्ञान, दांडगा अनुभव आणि कामावरची एकाग्रता या गुणांनी जपानी लोकांची मने जिंकून त्यांचा विश्वासही मिळवला.
सुरुवातीला केवळ जपानसाठी असणारे अपर्णा यांचे काम नंतर संपूर्ण आशियासाठी विस्तारले गेले. आता तर त्यांच्या कामाची व्याप्ती आणखीनच वाढली असून, त्याच कंपनीसाठी त्या ग्लोबल सर्व्हिस टॉवर हेड म्हणून कार्यरत आहेत.
चौकट :
एन्जॉय बिइंग अ वूमन-
बाळाला जन्म देऊन मातृत्व अनुभवणे, हे एक स्त्री म्हणून तुमचे वैशिष्ट्य आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर कामाला काही काळासाठी ब्रेक लागणे, हे अगदी स्वाभाविक आहे; पण यातून बाहेर पडून आपल्याला पुन्हा काम करायचे आहे, हे पक्के ठरवले तर अनेक मार्ग आपोआप सापडतील. त्यामुळे एन्जॉय बिइंग अ वूमन हा संदेश अपर्णा यांनी महिलांना दिला.
चौकट :
औरंगाबादची कचोरी आठवतेय-
औरंगाबादला माझी खूप लोकं आहेत. त्यामुळे त्यांची सगळ्यांची आठवण तर मला येतेच; पण औरंगाबादचे विविध खाद्यपदार्थही मी खूप मिस करते. खाद्यपदार्थांमध्ये सगळ्यात जास्त गायत्रीची कचोरी मला अनेकदा आठवते.