- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जगातल्या अनेक कंपन्यांच्या वाहनांतऔरंगाबाद शहर परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांमध्ये तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट असतोच. आश्चर्य वाटले ना, हो ही सत्य परिस्थिती आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींत आॅटोमोबाईल्स, कृषी, फार्मासह विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या आहेत. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर आता अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश झाला आहे. यामध्ये वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून वर्षभरात उत्पादनांतून सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. येथील औद्योगिक वसाहतींमध्ये निर्मित होणाऱ्या उत्पादनांना जगभरातून मागणी आहे.
औद्योगिक वसाहतींमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याबरोबर परदेशांत होणाऱ्या निर्यातीमुळे औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी औरंगाबादेत उत्पादन सुरूकेले. वाळूज औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात परदेशांत माल निर्यात होतो. चिकलठाणा एमआयडीसीत फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंंग, मद्यनिर्मिती, कंपोस्टर, चटई आदींचे उत्पादन होते. त्यामुळे निर्यातीमध्ये या वसाहतीचाही वाटा मोठा आहे.
औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांत तयार झालेले उत्पादन दररोज किमान १ हजार ५०० ट्रकमधून देशभरातील विविध शहरांत पाठविले जाते. दिवसाला २५ ते ३० हजार टन माल शहरातून पाठविला जातो. आजघडीला मुंबई, दिल्लीसह विविध शहरांतून देश- विदेशांमध्ये मालाची निर्यात केली जाते. एक-दोन नव्हे तर जगभरातील तब्बल ८० देशांमध्ये औद्योगिक उत्पादनांची निर्यात होते. आशियाई, आफ्रिकन देशांबरोबर, अमेरिका, युरोपमध्येही निर्यात होते. यामध्ये वाहन आणि वाहनांचे सुटे भाग, औषधी, सॉफ्टवेअरसह अनेक उत्पादनांचा समावेश आहे. यातून वर्षाकाठी १७ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.
वाहनांचे सुटे भाग बनविण्यात औरंगाबाद आघाडीवर आहे. शॉकअप, गीअर, क्लचप्लेटसह दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांच्या विविध सुट्या भागांची निर्मिती औरंगाबाद परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये होते. देशभरातील विविध औद्योगिक वसाहतींबरोबर परदेशांत वाहन निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्यांना सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे जगभरातील अनेक वाहनांमध्ये औरंगाबादचा निश्चित वाटा असल्याचा विश्वास उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. औरंगाबादेत सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यादेखील आहेत. बंगळुरू आणि पुण्याच्या तुलनेत औरंगाबादेत आयटी क्षेत्र फार मोठे नाही; परंतु शहरात कार्यरत कंपन्यांतून परदेशांमध्ये सॉफ्टवेअरदेखील निर्यात केले जात आहे.
सुट्या भागांचा पुरवठाऔरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींतील विविध उत्पादने ७० पेक्षा अधिक देशांत निर्यात होतात. जगभरात मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ब्रँडला औरंगाबादेतून सुट्या भागांचा पुरवठा होतो. परदेशांत सॉफ्टवेअरदेखील पुरविले जात आहे. जवळपास वर्षभरात १७ हजार कोटींची ही निर्यात असते.- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक
८० देशांत निर्यात औरंगाबाद वसाहतींतून साधारण ८० देशांत निर्यात होते. मशीन, फार्मा कंपन्यांचे उत्पादन, स्टील, फिल्म, पॉलिस्टर आदींची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. दुचाकी, तीनचार, चारचाकी वाहनांचे पार्टस् जगभर पाठविले जातात. जगभरात औरंगाबादचा मोठा वाटा आहे. - आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयए
चिकलठाण्याचा वाटापरदेशातील निर्यातीमध्ये २० टक्के वाटा हा एकट्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा आहे. वर्षभरात सुमारे २५० ते ३०० कोटींची निर्यात होते. चिकलठाणा विमानतळामुळे यात आणखी वाढ होण्यास वाव आहे.- किशोर राठी, अध्यक्ष, मसिआ