औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल १७ हजार बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगणवाड्यांमध्ये येणारी बालके सुदृढ राहावी, यासाठी त्यांना पोषक आहार दिला जातो. मात्र, वर्षानुवर्षे दिला जाणारा ‘पोषण आहार’ हा खराच पौष्टिक आहे का? मुलांना त्यातून जीवनसत्वे मिळतात का? हा प्रश्न कुपोषित बालकांच्या आकडेवारीवरून उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख २८ हजार १०७ बालकांना पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. यापैकी एप्रिलमध्ये २ लाख १९ हजार ५०६ बालकांचे वजन घेण्यात आले. तेव्हा २ लाख २ हजार २८२ बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये असल्याचे दिसून आले. ही आकडेवारी समाधानकारक असली, तरी दुसरी बाजू मात्र तेवढीच धक्कादायक आहे. मध्यम कमी वजनाची १३ हजार ९५० व तीव्र कमी वजनाची ३ हजार १४४ बालके आढळली आहेत. मध्यम व तीव्र कमी वजन या दोन्ही प्रकारातील बालके ही कुपोषित समजली जातात. मागील मे महिन्यापासून कुपोषित बालकांची संख्या साधारणपणे १७ हजारांच्या जवळपास स्थिर असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपोेषणमुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योजना राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होत नाही. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हाळ्यात बालकांचा आहार कमी होतो. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक ठिकाणचे हातपंप कोरडे पडले आहेत. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली जाते की नाही, हे पडताळून पाहणारी यंत्रणा नाही.
अनेक ठिकाणी मिळेल त्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. दूषित पाण्यामुळे बालकांना कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसारसारख्या रोगांचा सामना करावा लागतो. अंगणवाड्यांमार्फत संदर्भसेवा दिल्या जातात; पण अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेण्यासाठी कुटुंबांकडे वेळ नसतो. परिणामी, या दिवसांत वजन कमी होण्याचे प्रमाण जास्त असते, असे उत्तर पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांकडून दिले जाते.
अन्नाअभावी कुपोषण नाहीयासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम म्हणाले, जिल्ह्यात अन्नाअभावी कुपोषण होणारी एकही घटना नाही. अन्न आहे; पण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि आजारामुळे कुपोषणाची समस्या सर्वाधिक भेडसावते.जिल्हाभरात दर शनिवारी माता बैठका आयोजित करून पोषण, आहाराबाबत जागृती केली जाते. अलीकडे नव्याने महिला व बालविकास विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमार्फत कुपोषित बालकांवर विशेष लक्ष दिले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ४ ते १२ आठवड्यांपर्यंत बालकांवर उपचार केले जातात.