- संजय जाधवपैठण : तापमानाचा पारा वाढत चालल्याने जायकवाडीच्या जलाशयातील बाष्पीभवन प्रक्रिया वाढली आहे. विशेष म्हणजे १२ मार्च रोजी जवळपास दोन दलघमी (१.९४) बाष्पीभवन झाल्याची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षातील बाष्पीभवनाचा हा उच्चांक आहे. जायकवाडी धरणातून सरासरी दरवर्षी बाष्पीभवन प्रक्रियेेत जवळपास ११ टिएमसी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समोर आले असून बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा जायकवाडी हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक जवळपास १.९४ दलघमी पाणी बाष्पीभवन प्रक्रियेत उडाल्याची नोंद दि १२ मार्च, २०२० रोजी झाली आहे. जायकवाडी धरणातून सर्व पाणी पुरवठा योजने सहित औद्योगिक वसाहतींंना एका दिवसात जितके पाणी लागते त्या पेक्षा बाष्पीभवन प्रक्रीयेने एका दिवसात सहापट जास्त पाणी केवळ बाष्पीभवन प्रक्रियेत वाया जाते आहे. जायकवाडी धरणात आजच्या तारखेस एकूण २०५५.१७६ दलघमी ( ७२ टीएमसी) तर १३१७.०७ दलघमी (४६ टीएमसी) एवढा उपयुक्त जलसाठा शिल्लक असून जलसाठा ६०.६६% राहिला आहे. बाष्पीभवन प्रकियेत येथून पुढे सतत वाढ होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी २२ मार्च रोजी तर २०१६ ला १४ मार्च पासूनच जायकवाडीच्या मृत साठ्यातून पाणी उचलण्याची वेळ ओढवली होती या काळात बाष्पीभवन प्रक्रियेने वाया जाणाऱ्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले होते. दरम्यान, यंदा धरणात जलसाठा चांगला असून पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे. येणाऱ्या हंगामात प्रत्यक्षात पाऊस कसा राहिल हे सांगता येत नसल्याने धरणात अपेक्षित जलसाठा असणे भविष्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून सिंचनासाठी २०० क्युसेक्स तर उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेले आहे.
सहापट बाष्पीभवन.......जायकवाडी धरणातून विविध शहरांना पिण्यासाठी व वाळूज, शेंद्रा, पैठण, जालना औद्योगिक वसाहती साठी दररोज ०•२८९ दलघमी एवढा पाणी पुरवठा केला जातो. आजच्या तारखेस या उलट केवल बाष्पीभवन प्रक्रियेत याच्या सहापट म्हणजे १.९४ दलघमी पाणी बाष्पीभवन प्रक्रियेत नष्ट होत आहे.
धरण उथळ असल्याने जास्त बाष्पीभवन......
जायकवाडी धरणाच्या जलाशयाचा पानपसारा हा ३५००० हेक्टर अशा विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेला आहे. शिवाय या जलाशयाची खोली कमी आहे, यामुळे सुर्य किरणे जलाशयात खोलवर जातात. विस्तीर्ण क्षेत्र असल्याने या जलाशयातील बाष्पीभवनाचे प्रमाण ईतर धरणातील जलाशयाच्या मानाने जास्त होते. मार्च ते मे दरम्यान बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो ; असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
बाष्पीभवन प्रक्रियेस प्रतिबंध करने अवघड :-बाष्पीभवन प्रक्रियेची गती कमी करण्यासाठी रासायनिक केमीकल फवारण्याचा अवलंब केला जातो. परंतु , जायकवाडीचा पानपसारा हा ३५ हजार हेक्टर असा विस्तीर्ण असल्याने अशी उपाय योजना करणे शक्य नसल्याचे धरन अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.
गत पाच दिवसात झालेले बाष्पीभवन
______________________________
तारीख | बाष्पीभवन(दलघमी)
_____________|________________
११/४/२० | १.८९
१२/४/२० | १.९४
१३/४/२० | १.७१
१४/४/२० | १.७६
१५/४/२० | १.७९
_____________|________________
तरंगते सोलार प्लेटचा वापर ?जायकवाडी धरणातून होणारे बाष्पीभवन प्रक्रियेने जलाशयातील पाण्याची होणारी हाणी लक्षात घेता जलाशयाच्या विस्तिर्ण पाण पसाऱ्यावर तरंगते सोलार प्लेट टाकण्या बाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा होत आहे. सोलार प्लेटने बाष्पीभवन प्रक्रीयेचा वेग घटवीता येईल व विद्युत निर्मितीही करता येईल अशा पध्दतिची विचारधारा जायकवाडी प्रशासनात चर्चीली जात आहे. मात्र, पक्षी अभयारण्यामुळे या योजनेला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल व असे प्रमाणपत्र मिळणे अवघड असल्याने सध्यातरी या बाबत प्रशासकीय स्तरावर कुठल्याच हालचाली नसल्याचे समोर आले आहे.