छत्रपती संभाजीनगर : जिल्हा रुग्णालयात तुम्ही कधी गेला असाल तर नेहमीच आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णांना तपासताना पाहिले असेल. मात्र, आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) निवासी डाॅक्टर जिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेला बळ मिळाले असून, डाॅक्टरांच्या कमतरतेचा प्रश्नही निकाली काढण्याचा प्रयत्न आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जिल्हा निवासी कार्यक्रम बंधनकारक केला आहे. या अंतर्गत जिल्हा रुग्णालयाला ३-३ महिन्यांच्या कालावधीसाठी निवासी डॉक्टर मिळत आहे. हा कार्यक्रम सर्व निवासी डॉक्टरांसाठी बंधनकारक आहे. क्लिनिकल आणि पॅराक्लिनिकल विभागातील डॉक्टर थेट रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत असणार आहेत. याची नुकतीच सुरुवातही झाली आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) प्रत्येक विभागातील निवासी डाॅक्टर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
नव्या नियमाची अंमलबजावणीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड म्हणाले, ‘एनएमसी’च्या नव्या नियमानुसार निवासी डाॅक्टर जिल्हा रुग्णालयात देण्यात आलेले आहे. दर तीन महिन्यांनी निवासी डाॅक्टर बदलून देण्यात येतील.
हे निवासी डाॅक्टर झाले उपलब्धसर्जरी, मेडिसिन, बधिरीकरण, अस्थिव्यंगोपचार, बालरोग, कान-नाक-घसा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागांसह प्रत्येक विभागातून सुमारे ४० निवासी डाॅक्टर जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग आणि आंतररुग्ण विभागात जिल्हा रुग्णालयात निवासी डाॅक्टर रुग्णसेवा देत आहेत.