छत्रपती संभाजीनगर : शहरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात; पण महापालिकेने पर्यटकांसाठी कोणतेही धोरणच आजपर्यंत निश्चित केलेले नाही. आता लवकरच ते निश्चित केले जाईल. पर्यटकांना शहरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी दोन खुल्या बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. केंद्र शासन स्मार्ट सिटीला १०० इलेक्ट्रिक बसेस देणार आहे. ३५ इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था यापूर्वीच केली आहे. भविष्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी २३५ बस उपलब्ध होतील.
स्मार्ट सिटीने २०१८ मध्ये टाटा कंपनीकडून १०० डिझेल बस खरेदी केल्या. स्मार्ट सिटीच्या निधीतून आणखी ३५ नवीन इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेतल्या. लवकरच या बसेसही शहरात दाखल होणार आहेत. केंद्र शासनाने पीएमई बससेवा योजनेंतर्गत १०० इलेक्ट्रिक बस देण्याचा निर्णय घेतला. बसेस ठेवण्यासाठी आणि वापरण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा आवश्यक आहेत. त्यात बस डेपो आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असणे आवश्यक आहे. सध्या स्मार्टतर्फे जाधववाडी परिसरात ३०० बसेससाठी डेपो तयार होत आहे. या शिवाय वाळूज परिसरातील ४ एकर जागा एसटी महामंडळाला देण्यात आली आहे. ही जागा बसच्या डेपोसाठी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती नुकतीच प्रशासकांनी दिली. शहरात जास्तीत जास्त पर्यटक यावेत, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, पर्यटकांचा मुक्काम वाढावा, शहरातील पर्यटनस्थळे पाहता यावीत, म्हणून मनपा प्रमुख भूमिका बजावणार आहे. उघड्या डबल डेकरसारख्या दोन बसेस पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. पर्यटन धोरण निश्चित करण्यासाठी एका स्वतंत्र अधिकाऱ्याचीही नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्था मजबूतशहराची लोकसंख्या गृहीत धरता २३५ बसेस भविष्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध होतील. सध्या १०० डिझेल बसेस धावत आहेत. लवकरच ३५ इलेक्ट्रिक बस येणार आहेत. केंद्राकडून १०० बसेस प्राप्त होतील.