छत्रपती संभाजीनगर : आता शहराच्या आकाशात ‘ॲडव्हेंचर टुरिझम’ची मजा अन् काहीसा थरार पर्यटकांना अनुभवता येणार आहे. शहर परिसरातील साई टेकडी, गोगाबाबा टेकडीसह अन्य टेकडी आणि डोंगरांवर पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, हाॅटएअर बलूनचा आनंद पर्यटक आणि शहरवासीयांना महिनाअखेरपासून घेता येणार आहे.
मराठवाड्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, हॉटएअर बलून, पॅरासेलिंग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या साहसी खेळांसाठी परवाना दिलेल्या संस्थांचे नुकतेच शासनाच्या पथकाकडून ऑडिट करून पडताळणी करण्यात आली आहे. सर्व नियमांचे पालन करणाऱ्यांना यासंदर्भात हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे महिनाअखेरपासून तर मार्चपर्यंत शहराच्या आकाशात पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, हाॅटएअर बलूनचा अनुभव शहरवासीय, पर्यटक घेताना दिसतील.
काय आहे ‘ॲडव्हेंचर टुरिझम’?- पॅराग्लायडिंग : पॅराग्लायडिंग हा हवेतील उड्डाणविषयक साहसी क्रीडा प्रकार आहे. यात विशिष्ट प्रकारच्या कापड व दोरीच्या साहाय्याने पंख तयार करतात व ते हार्नेसला जोडून चालक त्यात बसतो. हवेच्या झोतावर स्वार होऊन हे उंच भरारी घेते.- पॅरामोटरिंग : साहसी खेळ प्रकारातील पॅराग्लायडिंगची पुढची पायरी म्हणजे पॅरामोटरिंग. या प्रकारात एक पायलट पॅराशूटसह इंजिनच्या मदतीने हवेत झेपावतो. हे इंजिन विशेष प्रकारचे असते. वर पॅराशूट आणि पाठीमागे प्रॉपलर असते. पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरिंगमध्ये केवळ मोटरचाच फरक असतो.- हॉटएअर बलून : गरम हवेचा फुगा हे विमानापेक्षा हलके विमान असते ज्यामध्ये पिशवी असते, ज्याला लिफाफा म्हणतात, ज्यामध्ये गरम हवा असते. खाली निलंबित गोंडोला किंवा विकर बास्केट असते, जे प्रवासी आणि उष्णतेचे स्रोत घेऊन जातात.
सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालनशहर परिसरातील टेकड्यांवरून महिनाअखेरपासून पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, हाॅटएअर बलून आदी साहसी क्रीडा प्रकार सुरू होतील. मार्चपर्यंत हे सुरू राहील. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून हे साहसी खेळ शहरवासीय आणि पर्यटकांना उपलब्ध करून देण्यावर भर असतो. ज्यांच्याकडे यासंदर्भातील लायसन्स आहे, त्यांचे नुकतेच केंद्र सरकारच्या पथकाकडून ऑडिटही करण्यात आले आहे.- जयंत गोरे, अध्यक्ष, मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर