औरंगाबाद : ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गरोदर माता, स्तनदा मातांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास मान्यता दिली आहे. आरोग्य यंत्रणेकडून जोरदार तयारी सुरू असून, आठवडभरात या लसीकरणाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गरोदरमातांना लस देण्यापूर्वी लेखी संमती घेण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. गेल्या सहा महिन्यांत विविध टप्प्यात लसीकरण करण्यात आले. आजघडीला १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस दिली जात आहे. परंतु गरोदर माता आणि स्तनदा मातांना लसीकरणातून वगळण्यात आले. पण काही दिवसांपूर्वीच कोरोना लसीकरणाविषयीच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केली होती. त्यानुसार गरोदर मातांच्या लसीकरणाला मंजुरी मिळाली आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी करून अथवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन गरोदर मातांना लस घेता येणार आहे. ही लस घेताना आधी लेखी संमती घेतली जाणार आहे. या लसीकरणासाठी आशा वर्कर्स, स्त्रीरोतज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घेण्यात येणार आहे. लस घेण्यासाठी गरोदर मातांनी पुढे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
चौकट..
लवकरच उद्घाटन
आठवडाभरात गरोदर माता, स्तनदा मातांचे कोविड-१९ लसीकरण सुरू होईल. या लसीकरणाची उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. लस देण्यापूर्वी त्यांची लेखी संमती घेतली जाणार आहे. कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड यापैकी कोणतीही लस गरोदर मातांना घेता येईल.
- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
---