औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका विभागीय कार्यालयात १०० टक्के जमा झाल्या आहेत. त्यामुळे आता निकाल जाहीर करण्याच्या कामाला वेग आल्याची माहिती विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
विभागीय मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा १६ एप्रिल रोजी संपली, तर दहावीचा भूगोलचा २३ मार्च ऐवजी होणारा पेपर कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक केंद्रांपर्यंत पोहोचू शकले नाही. याचा परिणाम तपासणीचे काम रखडले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली होती. विभागीय मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उत्तरपत्रिका जमा करण्यात आल्या आहेत. बारावीच्या उत्तरपत्रिका सहा दिवसांपूर्वी १०० टक्के जमा करण्यात आल्या, तर दहावीच्या उत्तरपत्रिका गुरुवारी १०० टक्के जमा झाल्या आहेत.
महिनाभर निकालासाठी लागणारउत्तरपत्रिका जमा झाल्यानंतर विभागीय मंडळाला विविध पडताळणी, डेटा अपलोडिंग, गुणपत्रिकांची तपासणी आणि छपाईसाठी महिनाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा आणि दहावीचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.