औरंगाबाद : दुष्काळ नियोजनात आतापर्यंत अपयशी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 'मनसे'च्या वतीने आज शहरात पैठणगेट येथून मोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी पैठणगेट येथे मराठवाड्यातून शेतकरी आणि मनसे कार्यकर्ते जमले आहेत.
पैठण गेट परिसरात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. मोर्चात दंडुका आणण्यास पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रतिनिधीक स्वरूपात दंडुके आणि उसाचे टिपरू घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले आहेत. मोर्चात काळे कपडे परिधान करून सहभाग नोंदविण्यात आला आहे. बैलगाडीसह मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत. यावेळी 'शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध' असे बॅनर लावलेल्या हेल्याने आणि यमाची वेषभूषा साकारलेल्या मोर्चेकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक ठिकाणचे कार्यकर्ते दाखल होणे बाकी आहे.
या आहेत मागण्याशेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये भाव, स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना पेन्शन, गत खरीप हंगामातील पिकविमा मिळावा, कोरडवाहु शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार, बागायतदारांना एक लाख अनुदान, गाव तेथे चारा छावण्या, मंडळानुसार नव्हे तर संपुर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, कृषिवीज बिले माफ करणे, कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई, बोंडअळीचे अनुदान मिळावे, पाणी टॅंकर सुरु करावे, तिथे प्रतिव्यक्ती ५० लीटर पाणी द्यावे, रोजगार हमीचे कामे सुरू करावी, उसाला एफआरपीप्रमाणे भाव, शैक्षणिक शुल्क माफीची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.