औरंगाबाद : कोरोनारूपी राक्षस जिल्ह्यात अक्षरश: थैमान घालत आहे. दररोज ३० ते ४० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. नैसर्गिक मृत्यूंची संख्याही तीन पटीने वाढली आहे. १५ मार्च ते १५ एप्रिल या एका महिन्यात एकट्या औरंगाबाद शहरातील ४५० नागरिकांचा मृत्यू झाला. ९९१ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला. १४४१ नागरिक शहरातील तर कोरोनामुळे मरण पावलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांवर देखील शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या महिनाभरात शहरातील स्मशानभूमीत १ हजार ८५९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
कोरोनाच्या मृत्यू सोबत नैसर्गिक मृत्यू सुद्धा वाढत आहेत. घाटी रुग्णालयाच्या शवागारात मृतदेहांची रांग दिसते. स्मशानभूमीत तर अंत्यसंस्कारासाठी कित्येक तास वाट पाहावी लागते. असे विदारक चित्र यापूर्वी शहराने कधीच बघितले नव्हते. मृत्यूचे आकडे हादरवून टाकणारे आहेत. ६ मार्चपासून शहरात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हळूहळू वाढू लागला. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत त्याची तीव्रता अधिक वाढत गेली. ३१ मार्चपर्यंत २११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा सिलसिला एप्रिल महिन्यात आहे सुरूच आहे. १५ एप्रिलपर्यंत शहरातील २३९ कोरोना रुग्णांनी दम तोडला. एका महिन्यात ४५० जणांचा मृत्यू झाला. कोरोना मृत्यूची लाट सुरू असतानाच नैसर्गिक मृत्यूची संख्या ही अफाट वाढत आहे. मागील महिनाभरात ९९१ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला.
एका अंत्यसंस्काराला किमान ३ तासशहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी मागील महिनाभरापासून अक्षरशः रांगा लागत आहेत. जागा मिळेल तेथे स्मशानजोगी अंत्यसंस्कार करीत आहेत. एका अंत्यसंस्काराची आग शमवण्यासाठी किमान ३ तास लागतात. ही आग विझेपर्यंत आसपास दुसरे सरण रचता येत नाही. आग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच बाजूला दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात, असे पुष्पनगरी येथील स्मशानजोगी गोविंद गायकवाड यांनी सांगितले.
जिल्ह्यातील, इतर जिल्ह्यांतील मृतदेहांवरही अंत्यसंस्कारकोरोना झालेले असंख्य रुग्ण मराठवाडा आणि इतर भागातून शहरात दाखल होत आहेत. इतर जिल्ह्यातील रुग्ण मरण पावल्यावर त्याच्यावर शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अशा मृतदेहांची संख्या जवळपास ४१८ आहे. एकंदरीत सर्व मृतदेहांची बेरीज केली तर १८५९ एवढी होत आहे. एका महिन्यात जवळपास दोन हजार नागरिकांना यमसदनी नेताना यमदूतही थकला असेल...!