औरंगाबाद : तुम्ही शहरातील रस्त्यांवर वाहनांतून प्रवास करीत असाल तर सावधान... कारण विविध रस्त्यांच्या मधोमध यमराज उभा आहे. हा यमराज म्हणजे विद्युत खांब होय. 'नजर हटी दुर्घटना घटी' याप्रमाणे जर रस्त्याने जाताना तुमचे लक्ष दुसरीकडे गेले तर वाहनासह तुम्ही सरळ विद्युत खांबावर जाऊन आदळू शकता. असे अपघाताला आमंत्रण ठरणारे एक किंवा दोन नव्हे, तर २००पेक्षा अधिक विद्युत खांब रस्त्यांमध्येच उभे आहेत.
रस्त्याच्या मधे उभ्या असलेल्या विद्युत खांबांची संख्या एकूण आपल्याला धक्काच बसला असेल. सध्या बीडबायपास रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. याच एकट्या रस्त्यावर दोन्ही बाजूला मिळून १००च्या जवळपास विद्युत खांब आहेत. जर हे खांब हटविले नाही हेच विद्युत खांब अपघाताला निमंत्रण ठरू शकतील.
जिन्सी ते नवबापुरापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मात्र, या रस्त्यामध्ये ३०च्या जवळपास विद्युत खांब आले आहेत. यामुळे अवघ्या ३० फुटी रस्ता वापरात येत आहे. विद्युत खांब हटविण्यासाठी महापालिकेने महावितरणला रक्कम दिली आहे. पण अजूनही खांब हटविण्यासाठी आदेश देण्यास महावितरणमधील अधिकाऱ्यांना वेळ मिळालेला नाही.
अशीच परिस्थिती सिटीचौक ते जुनाबाजार या रस्त्यावर आहे. या मार्गावर ३०पेक्षा अधिक विद्युत खांब रस्त्यावर आहेत. तसेच खासगेट रस्त्यावरही काही वेगळी परिस्थिती नाही. या रस्त्यामधील विद्युत खांबामुळे रस्ता रुंदीकरणाचा उद्देश सफल होताना दिसत नाही. महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन शहरातील रस्त्यामध्ये असलेले विद्युत खांब हटविण्यासाठी निर्णय घ्यावा व त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी शहरवासी करीत आहेत.
चौकट
कोणत्या मार्गावर विद्युत खांबरूपी यमराज
* जिन्सी ते नवाबपुरा
* सिटीचौक ते जुनाबाजार
* संपूर्ण बिडबायपासरोड
* खासगेट
* मिलकॉर्नर चौक
* सूतगिरणी चौक
* सिल्लेखान चौक
* मोंढा नाका उड्डाणपूल बाजूचा रस्ता
* नगारखाना गल्ली
* खाराकुँवा