खुलताबाद : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या म्हैसमाळ येथील श्री गिरीजादेवीचा यात्रोत्सव कोरोनाच्या सावटामुळे रद्द केला आहे. तहसील प्रशासन व मंदिर देवस्थान समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गिरीजादेवी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली.
माघ शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी श्री गिरीजादेवी मंदिर देवस्थानचा यात्रा उत्सव साजरा होत असतो. परंतु, राज्यात पुन्हा कोरोनाची संख्या वाढत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत हा सोहळा पार पडणार होता. या कालावधीत मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे दुकान, कंदुरीचे कार्यक्रम होणार नाहीत. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला. पौर्णिमेच्या दिवशी होणारे धार्मिक विधी व पूजा मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. तर मंदिरात प्रवेश करताना मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहणार आहे. सर्व भाविकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा विचार करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले.