औरंगाबाद : शहरात सर्वाधिक रहदारीचा असलेल्या जालना रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त सापडला आहे. रस्ता मजबुतीकरणासाठी आवश्यक ते सर्वेक्षण, विविध चाचण्या व भूगर्भ तपासणी पूर्ण झाली असून साधारणपणे १८ किंवा १९ मार्चपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
जालना रस्त्यावर चोवीस तास मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. आता मजबुतीकरणाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ‘एनएचएआय’ने ७४ कोटी मंजूर केले. या निधीतून फक्त मजबुतीकरणाचे काम होईल. जालना रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध नाही. जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. रस्ता रुंदीकरणात ज्या मालमत्ता संपादित करावयाच्या आहेत, त्याचा मावेजा कोणी द्यायचा? रस्त्याखालील जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या, टेलिफोन केबल काढून त्या इतरत्र शिफ्ट करणे या कामांसाठी लागणारा निधी व वेळ याची सांगड बसत नाही. त्यामुळे केवळ रस्ता मजबुतीकरणासाठी हा निधी मंजूर झाला आहे.
हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत असली, तरी या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया तांत्रिक मान्यता तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमध्ये सात-आठ महिने रखडली. अलीकडेच हैदराबाद येथील सृष्टी कंपनीला या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट मिळाले आहे. जालना रस्त्यावर एकूण पाच उड्डाणपूल आहेत. हे पूल देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे येतात. त्यामुळे या एकाच रस्त्यासाठी चार वेगवेगळ्या एजन्सी असल्याने तांत्रिक मंजुरीला विलंब लागला. दोन महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाली व गेल्या महिन्यात रस्त्याच्या सर्वेक्षण, भूगर्भ तपासणीला सुरुवात झाली.
अतिक्रमण : रस्ता अरुंदलोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या मजबुतीकरणाऐवजी विस्तारीकरणासाठी आग्रह धरला होता. मात्र, त्यासाठी मोठा निधी लागतो. तत्कालीन राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा रस्ता ‘एनएचएआय’कडे देण्यात आला. जालना रस्त्यावर मोठी वाहतूक आहे. बीड बायपासवरून जालना, नांदेड, विदर्भातून औरंगाबादेत येणारी वाहने जातात. यामुळे जालना रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी झाला असला तरी वाहनांची मोठी संख्या, ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे जालना रस्ता अरुंद झाला आहे.
जालना रस्त्याच्या एकवेळ सुधारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे शासनाने काम दिले आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाबाबत तांत्रिक तपासणी, भूगर्भ चाचणी पूर्ण झाली आहे. कामाची प्रत्यक्ष सुरुवात पुढील आठवड्यापासून होईल.-अजय गाडेकर, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण