औरंगाबाद : शहरात ११ व १२ मे रोजी झालेल्या दंगलीत दुकान, वाहन व घर या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे वर्र्षभरापासून कागदावरच आहेत.
दंगलीतील नुकसानीचा अंदाज नागरिकांच्या बयानातून (जबाब) बांधण्यात आला होता. त्या दंगलीत ६४ वाहने, ७५ घरे व दुकानांचे नुकसान झाले होते. १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यात करून शासनाकडे पाठविली होती. परंतु अजून शासनाकडून काहीही मदत मिळालेली नाही. अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, सतीश सोनी यांच्या पथकांनी पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शासनाकडे सादर केला होता.
राजाबाजार, नवाबपुरा, मोतीकारंजा, गुलमंडी, शहागंज येथे नुकसान झालेल्या पंचनाम्याची मूळ व बयानांची प्रत अहवालासोबत दिली होती. दंगलीत ६४ वाहने जळाली होती. १ कोटी २७ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे ते नुकसान होते. तसेच ७५ घर व दुकानधारकांच्या जबाबानुसार नुकसानीची रक्कम ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० रुपये इतकी गृहीत धरली होती. एकूण १३९ नागरिकांचे नुकसान त्या दंगलीत झाले होते. जबाबानुसार १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे ते नुकसान होते. महसूल, पीडब्ल्यूडी, मनपा, सिटी सर्व्हे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून त्या नुकसानीची पाहणी केली होती. दरम्यान अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले, अद्याप शासनाकडून मदतीबाबत काहीही सूचना आलेल्या नाहीत.
दंगलीतील नुकसान असे होते- वाहने : ६४- घरे व दुकाने : ७५- वाहनांचे नुकसान : १ कोटी २७ लाख ७३ हजार ५००- घर, दुकानांचे नुकसान : ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० - एकूण नुकसानधारक : १३९- एकूण नुकसान : १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपये