येरमाळा : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय व खामगाव- पंढरपूर या राज्य महामार्गावर तीर्थक्षेत्र येरमाळा हे गाव वसलेले आहे़ मात्र, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्तपदे, असुविधांमुळे सध्या व्हेंटेलेटरवर आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी कर्मचाऱ्यांनाच रुग्णांना सेवा पुरवावी लागत असल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशन मध्ये समोर आले़ विशेष म्हणजे चैत्री यात्रा काही दिवसांवर आलेली असतानाही येथे मुबलक आरोग्य सुविधा पुरविण्याकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे़आरोग्य सेवा ही अती महत्त्वाच्या सेवेतील एक सेवा आहे़ विशेषत: तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रांमधून अधिकाधिक चांगली सेवा मिळावी, यासाठी प्रशासन नेहमीच तत्परता दाखवित असते़ मात्र, जिल्हा प्रशासनाचे तीर्थक्षेत्र येरमाळा येथील आरोग्य केंद्रामधील समस्यांकडे आजवर कायम दुर्लक्षच होत आले आहे़ १५ हजार लोकसंख्येच्या येरमाळा गावासह परिसरातील १३ गावातील नागरिकांना आरोग्याची सेवा पुरविण्यासाठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे़ तर आरोग्य केंद्राअंतर्गत चोराखळी, पानगाव व रत्नापूर ही उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे मागील दीड-दोन वर्षांपासून रुग्ण सेवेत विस्कळीतपणा आला असून, रुग्णांसह नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर कामकाज सुरू असून, कार्यालयीन कामे, शिबीरे, बैठका, इतर ठिकाणच्या भेटी या कामामध्येच या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वेळ जात आहे़ तर वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपस्थित कर्मचारीच रुग्णांवर उपचार करीत आहेत़ आरोग्य केंद्रातील परिस्थितीची सोमवारी पाहणी केल्यानंतरही हा प्रकार समोर आला़ विशेष म्हणजे शनिवारी गेलेले डॉक्टर सोमवारी दुपारपर्यंतही आरोग्य केंद्रात आले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले़ डॉक्टर बैठकीसाठी गेलेत, व्हिजिटला गेलेत की इतरत्र कोठे आहेत याचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून मिळाले नाही़ याबाबत डॉ़ सोनटक्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही़ डॉक्टर येतील या आशेवर अनेक रुग्ण,नातेवाईक केंद्राच्या परिसरात बसलेले दिसून आले़ तर काहींनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून उपचार घेतले़ या रुग्णालयाची इमारतही धोकादायक झाली असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना या इमारतीतच काम करावे लागत आहे़ विशेष म्हणजे श्री येडेश्वरी देवीचा यात्राउत्सवही आता तोंडावर आला आहे. या यात्रेत किमान १० ते १२ लाख भाविक येतात़ या भाविकांची संख्या पाहता आरोग्य केंद्रात वाढीव उपायोजना केल्या जातात़ मात्र, रिक्तपदांमुळे होणारे रुग्णांचे हाल कायम आहेत़ ही परिस्थिी पाहता आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन रिक्तपदे भरण्यासह येथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे़दरम्यान, येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागात दररोज ७० ते ८० रुग्ण येतात़ अंतररुग्ण विभागातही काही रुग्ण उपचारासाठी थांबतात़ तर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अपघातातील जखमींना प्रथमोपचारासाठी याच केंद्रात आणले जाते़ सुविधांचा अभाव असल्याने जखमींना जिल्हा रुग्णालय किंवा बार्शीकडे पाठविण्यात येते़ सुविधांअभावी योग्य प्रथमोपचार मिळत नसल्याने अपघातातील जखमी अनेकांचे प्राणही गेले आहेत़ हे प्रकार थांबविण्यासाठी ट्रामाकेअर सेंटरची मागणी करण्यात आली होती़ मात्र, पाठपुराव्याला अपयश आल्याने हे सेंटर वाशी येथे गेले आहे़
येरमाळा ‘पीएचसी’ व्हेंटिलेटरवर
By admin | Published: March 27, 2017 11:49 PM