"हाेय, आम्ही महाविकास आघाडीत होतो, मात्र तेव्हाचे मुख्यमंत्री निर्णय घेत नव्हते"
By विकास राऊत | Published: September 18, 2023 01:29 PM2023-09-18T13:29:18+5:302023-09-18T13:31:41+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही दोघेही मंत्री होतो; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे योजनेचा प्रस्ताव घेऊन गेल्यावर ते निर्णयच घेत नव्हते. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना केली.
मराठवाड्यासाठी दि. १६ सप्टेंबर रोजी केलेल्या ५९ हजार कोटींच्या घोषणांवरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे, यावर मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्षाला एकच सांगायचे की, त्यांनी अडीच वर्षांत घोषणाही केल्या नाहीत. प्रकल्पांसाठी निधी मिळणारच आहे. जे कधी मंत्रालयात गेले नाहीत, ते काय घोषणा करणार. ठाकरे सरकारमध्ये आम्ही दोघेही होतो; परंतु आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही योजना घेऊन जायचो, त्यावर निर्णयच होत नव्हता. त्याचा अनुभव अजित पवारांनाही आहे. इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे. आम्ही सरकार पलटवले नसते तर राज्य आणखी मागे गेले असते, आता राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. जेव्हा जायचे होते, शेतकऱ्यांच्या बांधावर तेव्हा गेले नाहीत. तेव्हा तर घराजवळदेखील कुणाला येऊ देत नव्हते. तेव्हा नीट राहिले असते तर हे दिवसदेखील आले नसते, अशी टीकाही शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात होतो. मात्र, मंत्रिमंडळ प्रमुख म्हणून मुख्यमंत्री जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोवर निर्णय होत नाही. मंत्रिमंडळ निर्णयाची संचिका जेव्हा जाते तेव्हा त्यावर सकारात्मकच निर्णय होत असतो. सर्व पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना बोलून कामांना गती देऊ. यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची उपस्थिती होती.