औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत अनेक जण भावनेच्या भरात शेतकऱ्यांना मदत करीत आहेत; परंतु शेतकऱ्यांना मदतीपेक्षाही तुमच्या धीराची जास्त गरज आहे. कारण शेतकरी कधीही लाचार होऊ इच्छित नाही. तो देता आहे, असे मत कृषितज्ज्ञ विजय बोराडे यांनी मराठवाडा दुष्काळ संवेदना मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. तुम्ही व्यथा निवारण करा, गाथा आपोआप बनेल, असा सल्लाही त्यांनी संयोजकांना दिला. जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतीने देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात दुष्काळ संवेदना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, कृषितज्ज्ञ विजय बोराडे, उद्योजक समीर दुधगावकर, फाऊंडेशनचे नितीन चिलवंत, अॅड. विठ्ठल भिसे यांची उपस्थिती होती. फाऊंडेशनच्या वतीने परभणी जिल्ह्यातील मानवत आणि पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एक लाख बियाणे थैल्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी फाऊंडेशनने आतापर्यंत पुणे, परभणी आदी ठिकाणी मेळावे घेतले आहेत. विजय बोराडे यांनी फाऊंडेशनच्या या कामाचे कौतुक केले. परंतु सोबतच शेतकऱ्यांना तुमच्या मदतीपेक्षा धीराची गरज अधिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सध्या राज्यात भावनेच्या भरात अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र, कोणतीही मदत संबंधित व्यक्तीला लाचार बनविण्याचा धोका असतो. शेतकरी कधीही लाचार बनू इच्छित नाही. तो आज अडचणीत आहे. त्याला तुमच्या मदतीची गरज आहे; परंतु मोठा भाऊ म्हणून त्याला मदत करा, धीर द्या, असेही बोराडे म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनीही अडचणीतील शेतकऱ्यांसाठी फाऊंडेशन करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तर उद्योजक समीर दुधगावकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नितीन चिलवंत यांच्यासह इतरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. विठ्ठल भिसे यांनी केले. नुसत्या नद्या खोदू नकाकृषितज्ज्ञ विजय बोराडे यांनी नदी खोलीकरणाच्या उपक्रमावर यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले, आज शेतकऱ्यांच्या व्यथा अनेक अंगांनी समजून त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. शासनही नुसत्या नद्या उकरत आहे. तुम्ही नदी खोल केली तर माथ्यावरील विहिरींमधील पाणी नदीत येईल. विहिरी कोरड्या होतील. नाल्यात बारमाही पाणी दिसले, पण त्यामुळे नदीभोवतालच्यांचेच भले होईल. शिवाय जमीन पाणी मुरण्यासाठी पोषक थर आपण नाहीसा करतो आहोत. म्हणून खोलीकरणाऐवजी महात्मा फुल्यांनी सांगितलेल्या एकात्मिक पाणलोट विकासाचा मार्ग अवलंबिला पाहिजे, अशी अपेक्षा बोराडे यांनी व्यक्त केली.
तुम्ही व्यथा निवारण करा, गाथा आपोआप बनेल
By admin | Published: April 24, 2016 11:31 PM