छत्रपती संभाजीनगर : दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता आणि टीका आमच्यावर करता. ताल-कटोरा मैदानावर कशाला गेला होतात, हे आम्हाला माहीत आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेने विरोधकांना धडकी भरल्यामुळे ठाण्यात येऊन नको-नको ते बोलल्याची टीकाही त्यांनी केली.
आंबेडकरी समाज कृतज्ञता सोहळा समितीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी शहरातील टीव्ही सेंटर मैदानावर जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, संयोजक राहुल सोनवणे, जालिंदर शेंडगे, महेंद्र सोनवणे, कृष्णा बनकर, गौतम खरात आदींची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, हे सरकार काम करणारे आहे. घरात बसून फेसबुक लाइव्ह करणारे सरकार नाही. सरकार स्थापन झाल्यापासून ते कधी पडेल, याची वाट पाहत बसले, पण सरकार मजबूत होत गेले. मुंबईत इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेबांचे स्मारक होईल.
प्रत्येक तालुक्यात संविधान भवन...मुख्यमंत्री म्हणाले, देशातील घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. त्यांच्या संविधानावर देशाचा कारभार चालतो आहे. त्यांनी मुंबईनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी येथे स्थापन केली. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, त्यामुळे अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी बुद्धविहार, विपश्यना केंद्र उभारणार आहोत. शहरातील प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय उभारणार आहोत. बाबासाहेबांच्या अनुयायांना ज्यांनी व्होट बँक म्हणून वापरले त्यांना धडा शिकवा. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार म्हणून असा प्रसार केला, परंतु ‘जब तक सुरज चाँद रहेगा, बाबासाहेब का संविधान रहेगा’. संविधानाप्रति आदर व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर तालुक्यात संविधान भवन बांधण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी खा. भुमरे, मंत्री सावे यांची भाषणे झाली. पालकमंत्री सत्तार यांनी आभार मानले.