छत्रपती संभाजीनगर : भाजपचे केंद्रात सरकार आहे. राज्यातही आहे. त्याची तुम्हाला मदत होईल. त्यातच तुम्हाला चंद्रकांत पाटील हे डोक्यावाले मंत्री मिळाले आहेत. ते खोक्यावाले मंत्री नाहीत. त्यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, अशा शब्दात भाजपचे नेते माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच अप्रत्यक्षपणे टिका केली. निमित्त होते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्या सत्काराचे.
माजी आ. श्रीकांत जोशी अध्यक्ष असलेल्या टीर्चस एज्युकेशन सोसायटी संचलित विज्ञान वर्धिनी प्राथमिक व माध्यमिक शाळेचे डॉ. रविंद्र कुलकर्णी हे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या मैदानावर आज सकाळी सत्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात आ. जोशी बोलत होते. ते म्हणाले, पदवीधरचा आमदार म्हणून काम करताना शिक्षण क्षेत्राचा जवळून अनुभव आला. सध्याची परिस्थिती वाईट आहे. शाळा, संस्था, महाविद्यालये शिक्षण सम्राटांच्या नावाने ओळखली जाऊ लागली आहेत. पूर्वी तसे नव्हते, मी ज्या महाविद्यालयात शिकलो ते प्राचार्य ना.य. डोळे यांच्या नावाने प्रसिद्ध होते. आताही शिक्षकांच्या नावानेच शाळा, महाविद्यालयांची ओळख असली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यास पहिल्यांदा उच्च शिक्षण विभागाची सहसंचालक कार्यालये बरखास्त करून टाकेल. त्याठिकाणचा सर्व कारभार तुमच्यासारख्या कुलगुरूंच्या हातात देईल, असेही आ. जोशी यांनी यावेळी सांगितले.
सहकारीच म्हणू लागले खोक्यावाले मंत्रीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांसह आमदारांवर विरोधक ५० खोक्यावाले म्हणून कायम टिका करतात. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांची 'देशात मोदी, राज्यात शिंदे' या प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून भाजपमधील अनेक पदाधिकारी शिंदेसेनेच्या मंत्र्यासह आमदारांना खोक्यावाले म्हणू लागले आहेत. नांदेडमध्ये '५० खोके आणि १०५ डोके' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. त्याचवेळी माजी आ. जोशी यांनी तर भाजपच्या मंत्र्यांना डोक्यावाले आणि शिंदेसेनेच्या मंत्र्यांना खोक्यावाले असा शब्दप्रयोग केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.