औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करुन दिली.
'तुम्ही विरोधकांसोबत हातमिळवली केली'यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना माननारे लोक इथे जमले आहेत. त्यांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती, सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. पण, आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला आणि मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो, ते बाळासाहेबांच्या विचारांसाठी. जनतेने युतीला सत्तेत आणले होते, पण यांनी विरोधकांसोबत हातमिळवली केली.'
'खोक्यांचा हिशोब देणार...'मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'जे करायला नको होते ते त्यांनी केले. मतदार आणि हिंदुत्वाशी गद्दारी, विश्वासघात कोणी केला हे लोकांना माहित आहे. हे राज्य सामान्यांचे आहे, या राज्यात सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना नुकसानीसाठी भरघोस निधी देत आहोत. आम्ही कामातून उत्तर देत आहोत, म्हणून लोकांचे आम्हाला समर्थन आहे. तुम्ही आमच्यावर पन्नास खोक्यांची टीका करता, पण या खोक्यांचा हिशोब योग्यवेळी देईल,' असेही शिंदे म्हणाले.