लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील नगरपालिकेत शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांनी गुरुवारी आढावा बैठक बोलावली होती. याच बैठकीत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर व बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांच्यात घंटागाडी टेंडरवरून बाचाबाची झाली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. एकुणच या बैठकीत नगरसेवक आणि आ. मेटे, नगराध्यक्ष यांच्यात छोट्या-छोट्या मुद्यांवरून तु तु-मैं मैं झाल्याचे सूत्रांनी सांगितले.मागील काही दिवसांपासून नगर पालिका व शहरातील राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना पहावयास मिळत आहेत. एरव्ही क्षीरसागर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे आ.विनायक मेटे मागच्या काही दिवसांपासून क्षीरसागर यांच्याशी जवळीक करताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण येत आहे. दरम्यान, १९ जून रोजी आयोजित केलेली बैठक आ.मेटे यांनी काही कारणास्तव पुढे ढकलली होती. अखेर ही बैठक गुरुवारी पार पडली. सुरूवातीला ही बैठक मुख्याधिकारी यांच्या कक्षात होणार होती. त्याप्रमाणे आघाडीचे सर्व नगरसवेक मुख्याधिकारी यांच्या कक्षात बसलेले होते. परंतु आ.मेटे यांनी नगराध्यक्ष केबीनमध्ये थेट एन्ट्री केली. येथेच त्यांनी विभाग प्रमुखांशी ओळख करून घेत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यास सुरूवात केली. इकडे आघाडीच्या नगरसेवकांना बैठकीची जागा बदलल्याचे समजल्यावर त्यांनी नगराध्यक्षांचा कक्ष गाठला. काही वेळ चर्चा झाली. एकमेकांनी राजकीय चिमटे घेतले. त्यानंतर काकु-नाना आघाडीचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. स्वच्छता विभाग प्रमुखांना बोलत असताना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी त्यांना थांबविले. कर्मचाऱ्यांवर दबाव आणू नका, शांततेत बोला, असा सल्ला दिला. त्यानंतर नाईकवाडे यांनी स्वच्छता टेंडरचा मुद्दा उपस्थित केला. केवळ दोन घंटागाडी टेंडर पात्र ठरले आहेत. नियमाप्रमाणे तीन टेंडर होणे आवश्यक आहेत. याच मुद्यावरून नाईकवाडे व नगराध्यक्ष यांच्यात बाचाबाची झाली. नागरी सुविधांवर आपण बोलू. आपण जनतेतून निवडून आलो आहोत, सोबत काम करू, असे सांगितले. परंतु नाईकवाडे यांनी सायकल घंटागाडी, स्वच्छता व इतर नागरी सुविधांना धरून चांगलेच आक्रमक झाले होते. एवढे होत असताना आ.मेटे मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत होते. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अमर नाईकवाडे यांच्यासह रणजीत बनसोडे, प्रभाकर पोपळे हे नगरसेवक तावातावाने बैठक सोडून उठून निघून गेले. त्यानंतरही बैठक सुरूच राहिली. बैठकीला अधिकारी, नगरसेवक, विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.
घंटागाडी टेंडरवरून तु तु-मैं मैं !
By admin | Published: June 23, 2017 12:55 AM