छत्रपती संभाजीनगर : शाळेच्या व्हरांड्यात शिक्षिकेचे नाव लिहून जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी रोकडिया हनुमान कॉलनीतील विज्ञान वर्धिनी शाळेत उघडकीस आला. याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरुन क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार शुभांगी काथार या विज्ञान वर्धिनी शाळेत शिक्षिका आहेत. शाळेला ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या सुट्या होत्या. ४ नोव्हेंबरपासून शाळेचे कार्यालय सुरू झाले होते. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुख्याध्यापक कार्यालय बंद करून घरी निघून गेले. सोमवारी सकाळी १०:३० वाजता मुख्याध्यापक शाळेत गेले तेव्हा त्यांना कार्यालयासमोर मोठी काळी बाहुली ठेवलेली आणि व्हरांड्यात पांढऱ्या रांगोळीने तक्रारदारांचे आडनाव लिहिलेले दिसले. गोल रांगोळी काढून चांदणी आकाराची पणती ठेवली होती, हळदी-कुंकू टाकलेले होते. त्यावर ‘काथार तू गई’ असे शब्द लिहून फुली काढली होती. तेथेच आणखी एक काळा बाहुला होता. त्याच्या शेजारी लिंबू, कवडी, मिरची काळ्या धाग्यात बांधून ठेवले होते. दोन लिंबू कापून त्यावर हळदी-कुंकू टाकलेले होते. काळे केस गुंडाळलेले तसेच लाकडी वस्तू जाळून त्यावर कडूनिंबाची पाने टाकलेली होती. हा प्रकार पाहून मुख्याध्यापकाने तक्रारदारांना फोन केला. त्यांनी शाळेत जाऊन हे दृश्य पाहिल्यांनतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.