छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडील औषधे संपल्याने रुग्णालयांना इतर शासकीय रुग्णालयाकडून औषधे उसने घेऊन रुग्णांना पुरवावी लागतात. अनेकदा आवश्यक औषधे नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. राज्यातील काही रुग्णालयांमध्ये अनेकदा अशी परिस्थिती उद्भवत असल्याने त्याचा रुग्ण आणि नातेवाइकांना फटका बसत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाकडे आजघडीला शंभराहून अधिक औषधींचा ठणठणाट आहे.
मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांसाठी आधार असलेल्या घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत औषधीच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ‘डाॅक्टर तपासतील, निदान करतील; पण औषधींची व्यवस्था तुम्हीच करा’ अशी अवस्था झाली आहे.
औषधींच्या चिठ्ठ्या घेऊन रुग्ण, नातेवाईक परिसरातील मेडिकल गाठतात. ११७७ खाटांच्या घाटी रुग्णालयात प्रत्यक्षात १६०० ते १७०० रुग्ण भरती असतात, तर बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी २ हजार रुग्ण येतात. त्यामुळे दररोज किमान ४ हजार रुग्णांना औषधी द्यावी लागतात.
इतरांकडून घेतली ७५ लाखांची औषधेघाटी रुग्णालयातील औषधी कोंडी दूर करण्यासाठी धुळे, जालन्यासह अन्य जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांकडून काही दिवसांत सुमारे ७५ लाखांची औषधी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही परिस्थिती राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांची असून आपल्याकडे नसलेली महत्त्वाची औषधे इतर जिल्ह्यातून उसनवारीवर घेतली जातात.
औषधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. काही जिल्हा रुग्णालयांकडून औषधी घेण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार औषधी उपलब्ध करून घेण्यात येत आहे. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखांचे पॅकेज देण्यात येत आहे. त्यातून औषधीचा प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. - डाॅ. संजय राठोड, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
संस्थांचा पुढाकार घाटी रुग्णालयात औषधे मिळत नसल्याने रुग्णांना अतिरीक्त पैसे खर्च करून बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात. रुग्णांची ही नित्याची गरज पाहता रुग्णालयाच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुने १५ हून अधिक मेडिकल आहेत. आता काही सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत.