छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वात पाठीमागे बसणारा विद्यार्थी आज सर्वात पुढे आहे. त्याचा मला अभिमान वाटतो. शाळेत मी खोडकर असल्यामुळे मुख्याध्यापक दाशरथे चिडून म्हणायचे, तू चपराशीसुद्धा होणार नाहीस. परंतु त्यांनी त्यावेळी बोलल्यामुळे मी आज इथपर्यंत आलो आणि तुमच्यासमोर बोलत आहे, अशा पद्धतीने पालकमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी जि.प.च्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला, निमित्त हाेते स्वदेश कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना सोमवारी केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सीईओ विकास मीना, अर्जुन गाडे, कृष्णा पाटील डोणगावकर, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, माजी कुलसचिव डॉ. भगवान साखळे, प्रशांत गावंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लता पगारे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अरुणा भुमकर यांच्यासह राज्यभरातून शेकडो माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सीईओ असताना १५० गावांत फिरलो. तब्बल १६ कोटी रुपये जमा केले. त्यातून २ हजार ६०० शाळा स्वच्छ व सुंदर बनवल्या. हा प्रयाेग आज राज्यात सर्वत्र राबविण्यात येत असल्याचे सांगितले. सीईओ विकास मीना यांनी स्वदेश कार्यक्रमातंर्गत पालकांना साेबत घेऊन मुलांच्या विकासाचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पालकांच्या क्रीडा स्पर्धा घेणारी जि. प. ही एकमेव असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी अरुण भुमकर यांनी प्रस्तावना केली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिीक्षक अशोक बनकर, जयश्री चव्हाण, अनिल साबळे, मनोज चव्हाण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रमेश ठाकूर व प्रवीण लोहाडे यांनी केले.
चित्तेपिंपळगावचे बागडे राजस्थानात तर तिथले मीना इथेराजस्थानमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले सीईओ विकास मीना हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जि.प.शाळा सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तर चित्तेपिंपळगाव येथील जि.प. शाळेत शिकलेले ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आता राज्यस्थानचे राज्यपाल बनले आहेत. त्याठिकाणी जाऊन तेही सुधारणा करणार असल्याचे पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले.