गंगापूर : तालुक्यातील मालुंजा (खु) गावातील तरुण व तरुणीने काही तासाच्या अंतराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली. एकाच दिवशी आत्महत्या केल्याने प्रकरण (Young boy and girl commits suicide on the same day) संशयास्पद असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. उमेश संताराम साळुंखे (२७) व तबसुम मुजीब शेख (१८) असे मृत युवक व युवतीचे नाव आहे. दरम्यान, मृत तरुणाच्या वडिलांनी माझ्या मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली असून गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गावचा उपसरपंच कृष्णा ऊर्फ बंडू पवार (३२) यास ताब्यात घेतले आहे.
उमेश साळुंखे शनिवारी (दि. १३) रात्री उशिरा गावाजळील तुपे वस्तीवरील स्वतःच्या शेतात झोपण्यासाठी गेला होता. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याचे वडील शेतात गेले असता उमेश कांद्याच्या चाळीतील लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शकील शेख यांनी पंचनामा केला. उमेशच्या आत्महत्येची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. उमेश हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.
दुसऱ्या एका घटनेत मालुंजा गावातीलच तबसुम मुजीब शेख (१८) ही तरुणी रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरात छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या भावाला आढळून आली. भावाने लगेच आईला बोलावून घेतले. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिच्या पश्चात आई, लहान भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.
व्हिडिओ व्हायरल करून बदनामीची दिली जात होती धमकीमालुंजा गावचे उपसरपंच बंडू ऊर्फ कृष्णा रावसाहेब पवार (३२) व कोमल आशाबाई ढवळे (२६) हे दोघे माझा मुलगा उमेशला तुझे अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहेत, तू आम्हाला पैसे दे नाहीतर ते व्हिडिओ आम्ही समाज माध्यमातून सर्वांच्या मोबाईलवर व्हायरल करू, असे धमकी देत असत. त्यामुळे या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच उमेश याने बदनामीच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मयत उमेश याचे वडील संताराम पंढरीनाथ साळुंखे यांनी दिली. त्यानुसार कृष्णा पवार व कोमल ढवळे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कृष्णा पवार यास पोलिसांनी अटक करून त्याचा मोबाईल जप्त केला आहे. पुढील तपास पोउनि. शकील शेख करीत आहेत.
...अखेर गुन्हा दाखल झालामयत उमेश याची आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा आरोप उमेशच्या वडिलांनी केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नसता मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे काही काळ गंगापूर पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.