औरंगाबाद: विवाहित प्रेयसीने भेटायला आणि त्याच्यासोबत घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने त्याने आरडाओरड करीत अपार्टमेंटच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ईटखेडा येेथे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास झाली. याप्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तुषार संजय गायकवाड(३२,रा.ठाणे )असे मृताचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तुषार हा मुंबई महापालिकेत नोकरी करीत होता. त्याच्या ठाणे शहरातील तरूणीसोबत त्याचे प्रेम होते. तिच्या घरातील मंडळीना त्यांचे प्रेम मान्य नसल्याने त्यांनी तिचे लग्न औरंगाबादेतील एका तरूणासेाबत लावून दिले. लग्नानंतर तरूणीला दोन अपत्य झाली. ती पतीसोबत ईटखेडा परिसरात राहते. मात्र तुषारचे तिच्यावर प्रेम असल्याने त्याने लग्न केले नाही. तो तिला भेटण्यासाठी अधूनमधून औरंगाबादेत यायचा. काल बुधवारी तो येथे आला आणि त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. तू माझ्यासोबत चल असे तो तिला म्हणत होता. पती घरी असल्याने तिने त्यास भेटण्यास नकार दिला. शिवाय येथून निघून जा,असे ती वारंवार त्यास सांगत होती. याचा राग आल्याने तो तिच्या अपार्टमेंटमध्ये गेला. तेथे त्याने आरडाओरड करून तिला पुन्हा घराबाहेर येण्यास सांगितले. यानंतरही तिने नकार देताच तुषार अपार्टमेंटच्या छतावर गेला आणि त्याने तेथून थेट खाली उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्या बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती रहिवाश्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविली. सातारा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तुषारला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तुषारला तपासून रात्री १०.५० वाजता मृत घोषित केले. पोलीस हवालदार युवराज हिवराळे तपास करीत आहेत.
मृतदेह दिवसभर घाटीतील शवागृहातडॉक्टरांनी तुषारला तपासून मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी त्याचे प्रेत घाटीतील शवागृहात ठेवले. आणि त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करून या घटनेची माहिती त्यांना कळविली. त्याचे नातेवाईक ठाणे येथून निघाले होते. गुरूवारी सायंकाळपर्यंत घाटीत पोहचले नव्हते. त्यांच्या उपस्थितीत त्याचा शवविछेदनपूर्व पंचनामा केले जाईल.यानंतर शवविछेदन झाल्यावर प्रेत त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.