औरंगाबाद : जुन्या भांडणावरून तरुणांमध्ये झालेल्या वादातून प्रितेश प्रभाकर शिंदे (वय १८) या तरुणाचा रविवारी मध्यरात्री चाकूने भोसकून खून करण्यात आला. या घटनेनंतर पुंडलिकनगरात खळबळ उडाली आहे.
पुंडलिकनगर गल्ली क्रमांक १ येथील रहिवासी प्रितेश याचे गल्ली क्रमांक ४ मधील रहिवासी नंदू शेलारसोबत भांडण झाले होते. लॉँड्रीचालक प्रवीण दत्तात्रय राऊत, राजू जनार्दन पैठणकर आणि बेबी राऊत हे रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास साथीदारांना सोबत घेऊन गल्ली क्रमांक १ मध्ये गेले. तेथे प्रितेशला गाठून मारहाण केली व चाकूने त्याला भोसकले.
या घटनेनंतर प्रितेशला नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रितेशला तपासून रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती कळताच पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे उपनिरिक्षक प्रभाकर सोनवणे, योगेश धोंडे, विकास खटके आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रात्री उशिरा प्रवीण दत्तात्रय राऊत यास पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर फरार झालेला मुख्य आरोपी राजू पैठणकर यास पहाटे ५ वाजेच्या दरम्यान जुना मोंढा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रितेश नुकताच झाला १२ वी पास 53% गुण घेऊन मयत प्रितेश नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. त्याला तीन बहिणी असून, दोन बहिणींचे विवाह झाले आहेत, तर तिसरीचे शिक्षण सुरू आहे.