कन्नड - पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी जातांनाच काळाने बेडी टाकली मात्र या बेडीतुन निसटणे शक्य न झाल्याने या बावीस वर्षाच्या तरूणाला काळाने ओढून नेले. मंगेश सोमनाथ राहणे असे मृताचे नाव असून ही घटना कन्नड -औरंगाबाद रस्त्यावरील गजानन हेरीटेजसमोर गुरुवारी पहाटे घडली.
तालुक्यातील हतनुर येथील मंगेश सोमनाथ राहणे (२२) व त्याचा मित्र आकाश काकडे हे दररोज पहाटे ५ वाजता कन्नड शहरात भरतीपूर्व प्रशिक्षणास मोटारसायकलने येत असत. मात्र गुरुवारी पोट दुखण्याच्या कारणावरुन आकाश घरीच थांबला तर मंगेश रोजच्याप्रमाणे आजही मोटारसायकल (क्र एमएच २० एएच ५००७) ने कन्नडला येण्यासाठी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हतनुरहून निघाला. पण तो कन्नडला पोहोचण्यापुर्वीच गजानन हेरिटेज समोरील लिंबाच्या झाडाला धडकला. धडक अशा पध्दतीने बसली की दुचाकी लावून तिच्यावर बसुन झाडाच्या खोडाला डोके टेकवून झोपला असावा असा भास होत होता.
सकाळी काही वेळानंतर नागरिकांच्या निदर्शनास हे दृश्य आले. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजी थेटे, होमगार्ड गणेश टोंपे, आश्विन मोरे, कैलास निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मंगेशला कन्नड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची वार्ता मिळताच हतनुर गावावर शोककळा पसरली. प्रत्येकाच्या तोंडी स्मिता साळवी यांच्या कवितेतील ' आयुष्याच्या पटावर नियती मांडते डाव, पुढची खेळी काय ते नाही कुणाला ठाव !' या अर्थाने समजुत काढणारे शब्द होते. मयत मंगेशच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ,भावजयी असा परिवार आहे.