दौलताबाद: मिटमिटा येथील पिसहोम सोसायटीमध्ये चाळीस वर्ष इसमाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. मंटुस कुमार सिंग (४०, मूळ रा. बिहार ) असे मयताचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी हा खून झाल्याची प्राथमिक माहीती छावणी एसीपी विवेक सराफ यांनी दिली.
मंटुस कुमार सिंग मागील सहा महिन्यांपासून मिटमिटा येथील पिसहोम हौसिंग सोसायटीमध्ये फ्लँट न.एच १३ येथे भाड्याने राहत होता. त्याचा मित्र बबलू याने तीन दिवसांपूर्वी त्याची कार फिरायला नेली होती. बुधवारी सकाळपासून तो मंटूसकुमारला कॉल करीत होता. मात्र, तो कॉल उचलत नव्हता. यामुळे सकाळी ११ ते ११ :४५ वाजेच्या सुमारास बबलू गाडी परत करण्यासाठी सोसायटीत आला. बबलूने फ्लॅटचा दरवाजा वाजवला , मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच आतून दूर्गंधी येत असल्यामुळे त्याने बनावट चावीने दरवाजा उघडला.
यावेळी मंटुसकुमार सोफ्यावर मृतावस्थेत पडलेला दिसला. सोफ्यावर आणि फरशीवर खाली रक्त सांडलेले होते. मंटुसकुमारच्या पोटात वार करण्यात आल्याने आतडे बाहेर आलेले होते. हे दृश्य पाहून बबलूने लागलीच याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.दिनेश कोल्हे , विवेक सराफ, पो. निरीक्षक मनोज पगारे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, फँरेन्सिक पथक आदिंनी तपासणी केली. या घटनेची छावणी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास पोलीस निरीक्षक मनोज पगारे करत आहेत.
पँथर संघटनेचा कार्यकर्ता मयत मंटुसकुमार हा पॅंथर संघटनेचे काम करत होता . शिवाय तो खाजगी बॅंकेची कर्ज वसूली आणि प्लॉटींग एजंट होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मयत विवाहीत होता. त्याला पाच ते सहा वर्षाची मूलगी असल्याचे समजले. खून कोणी आणि का केला याबाबतचा तपास पोलिसानी सुरू केला.